लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:53 AM2017-09-27T00:53:55+5:302017-09-27T00:53:55+5:30
महापालिका निवडणुकीत छाननीमध्ये ९१४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ९९ अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा बुधवार अंतिम दिवस आहे. बुधवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हा दिवसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीत छाननीमध्ये ९१४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ९९ अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा बुधवार अंतिम दिवस आहे. बुधवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हा दिवसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मनपा निवडणुकीसाठी ११४८ उमेदवारी अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले होते. त्यात एकाच उमेदवाराने उमेदवारी अर्जाची झेरॉक्स करुन दोन ते तीन वेळा आॅनलाईन सबमीट केल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. सोमवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत आॅनलाईन प्रक्रियेमुळे मोठा विलंब झाला.
निवडणूक प्रक्रियेत बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांची मनधरणीही सोमवारपासून सुरू आहे. यात किती उमेदवार आता माघार घेतील हे स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी पक्षाने तिकीट न दिलेले किती उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतील, याकडे लक्ष लागले आहे.
पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित केल्यानंतर तिकीट न मिळालेल्या असंतुष्टांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधातच मोहीम चालवली होती.
कोण कोणाचे तिकीट कापले यावरही सोशल मीडियासह कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा झाली. पक्षासह इच्छुकांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केली होती. ती उमेदवारी कायम ठेऊन पक्षाच्या किती अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणले जाते, हेही बुधवारीच दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.