आज स्पष्ट होणार अंतिम लढतीचे चित्र
By Admin | Published: February 6, 2017 10:55 PM2017-02-06T22:55:47+5:302017-02-06T22:57:44+5:30
लातूर :मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे.
लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुकांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जि.प. गटाच्या ५८ जागांसाठी ५१५ आणि पं.स.च्या ११६ जागांसाठी ८२६ उमेदवारी अर्ज आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे. या मनधरणीस कितपत यश येते, हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुकांबरोबर स्थानिक आघाड्या व अपक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे एका पक्षाचे दोन-दोन उमेदवार अनेक गटांतून आहेत. बंडाच्या तयारीत असलेल्या या उमेदवारांची उमेदवारी अंतिम राहते की, ते रिंगणातून माघार घेतात, यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरूच असून, अन्य पदांची आमिषे दाखवून त्यांना भुलविण्याचाही प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे उद्या दुपारी नेमके काय होणार? कोणत्या गटांमध्ये कोण आणि कोणत्या गणांमध्ये कोण? याचे अन् लढतीचेही चित्र स्पष्ट होईल.