प्रशासन लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र
By Admin | Published: June 12, 2014 12:54 AM2014-06-12T00:54:46+5:302014-06-12T01:40:42+5:30
जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले
जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी व्यक्त केले.
एक दिवसाचासुध्दा पालिकेच्या कामाचा अनुभव नाही. असे असतानासुद्धा थेट ‘अ’ वर्गामध्ये पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा बाबासाहेब मनोहरे यांना पदभार कसा काय दिला? असा सवाल चिन्नादोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केला.
शासनाकडून मनोहरे यांची नियुक्ती झाली असताना त्यांना कोणताही अनुभव नसताना पालिका प्रशासनाने रूजू करून का घेतले? मुख्याधिकाऱ्यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त ठरली असतानासुद्धा त्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी अविश्वास ठराव का आणला नाही? असे प्रश्न आता जनतेसमोर पडू लागले असल्याचे चिन्नादोरे यांनी म्हटले.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणताही विरोध न होता सर्वानुमते ठराव का घेतले जातात, असा आरोप करीत, चिन्नादोरे यांनी या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जायकवाडी -जालना पाणीपुरवठा योजनेत अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असतानासुद्धा संबंधित कंत्राटदाराची बिले काढण्यासाठी पालिका प्रशासनाने घाई-गडबड दाखविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहर अंधारात आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुंबल्या आहेत.
पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. यासह अन्य प्रश्नही भयावह झाले आहेत. असे असतांना मुख्याधिकारी मूग गिळून गप्प आहेत, असे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)
सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पालिकेअंतर्गत अनागोंदी कारभाराच्या विरोधात ओळीनेही बोलण्याची भूमिका घेतली नाही. हेच लोकप्रतिनिधी आता भयावह झालेल्या प्रश्नांविरोधात रस्त्यावर येऊन झगडणार का? असा सवाल चिन्नादोरे यांनी व्यक्त केला.