'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:01 PM2023-01-06T12:01:00+5:302023-01-06T12:10:17+5:30

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे.

Pigeons in danger due to 'Pigeons Ruby'; Big trade in flesh and blood from superstition | 'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

googlenewsNext

- श्यामकुमार पुरे
सिल्लोड :
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी हा महत्त्वाचा घटक असून, पक्षघात अथवा पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला कबुतरांचे मांस व रक्ताने मालिश आणि इंजेक्शन घेतल्याने फरक पडतो, या अंधविश्वासातूनही कबुतरांचा बळी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कबुतरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ग्रामीण भागात याच पारव्याचा पक्षघात -लकवा-पॅरालिसिस या आजारावर उपचारासाठी अघोरी पद्धतीने सर्रास वापर केला जातो. रानटी कबुतराचे रक्त व मांस गरम प्रकृतीचे असते. त्यामुळे लकवा बरा करण्यासाठी पारव्यांचा जीव घेतला जात आहे. या कबुतरांच्या पायातील जुगुलर व्हेनमधून रक्त काढले जाते व ते गोठण्याच्या आतच ते लकवा झालेल्या व्यक्तीच्या कमरेत स्नायूमध्ये इंजेक्शनने टोचले जाते. अवघ्या २ मिनिटांच्या आतच या पक्षाचे रक्त गोठते. त्यामुळे तत्सम वैदू व उपचारकर्ते घाईतच ते टोचतात. त्यातून अनेकदा गुंतागुंत ही उद्भवते. यास वैद्यकशास्त्रीय असा कुठलाही आधार नाही. बऱ्याच जणांना या रक्ताची ॲलर्जी ही होते. 
सोबत या पक्ष्याचे मांसही लकवाग्रस्त व्यक्तीस खाऊ घालतात तर याचे रक्त काढून लकवा झालेल्या भागात चोळले जाते. असे हे पक्षी अनेक कामी मारले जातात. रक्त वाळल्यावर अंगात ताठरपणा जाणवतो व हाच फायदा काहीजण समजतात. ही जंगली कबुतरे, मासे पकडण्याचे जाळे लावून पकडली जातात. विशेषतः विहिरीमध्ये ती अधिवास करतात. रात्री ती विहिरीत निवांत पडलेली असताना विहिरीवर जाळे टाकून, आवाज करून त्यांना पकडले जाते.

रक्ताचा अंगठीतील खड्यासाठी उपयोग
कबुतराचे रक्त वाळल्यावर दगडासारखे टणक बनते व या वाळलेल्या रक्ताच्या खड्यांपासून पिजण रुबी जेम्स नावाचे रत्न (खडे) बनवले जातात. हे रत्न अंगठीमध्ये परिधान करणे भाग्यशाली समजले जाते, मात्र अनेक जंगली कबुतरे याकामी नाहक मारली जात आहेत.

ही तर अंधश्रद्धा
पक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अंधश्रद्धेपोटी अनेक पक्ष्यांची शिकार होत आहे. अभिनव प्रतिष्ठानमार्फत आम्ही याबाबत जनजागृती करीत आहोत. आजपर्यंत शिकाऱ्याच्या तावडीतून अनेक पक्षी सोडविले आहेत. याकडे वनविभागाने लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनीही लकव्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत, विनाकारण पक्ष्यांचा बळी घेऊ नये.
- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक, सिल्लोड

Web Title: Pigeons in danger due to 'Pigeons Ruby'; Big trade in flesh and blood from superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.