औरंगाबादमध्ये रंगणार राज्य पिकलबॉलचा धडाका
By Admin | Published: September 23, 2016 04:14 AM2016-09-23T04:14:24+5:302016-09-23T04:14:24+5:30
औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलामध्ये २४ व २५ सप्टेंबरदरम्यान पाचव्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेची रंगत रंगणार आहे.
मुंबई : औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलामध्ये २४ व २५ सप्टेंबरदरम्यान पाचव्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेची रंगत रंगणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये होत असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून २७ संघ सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र राज्य पिकलबॉल संघटनेच्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा पिकलबॉल संघटनेच्या वतीने होत असलेल्या या स्पर्धेत पुरुष व महिला गटात सामने पार पडतील. याआधी अहमदनगर, मुंबई, जळगाव आणि सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत औरंगाबादने जबरदस्त वर्चस्व राखले होते. त्यामुळेच यंदा यजमान असलेल्या औरंगाबादच्या कामगिरीवर सर्वांचेच विशेष लक्ष असेल.
त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्ण कामगिरी केलेल्या अतुल एडवर्ड व मनिष राव यांचाही प्रवेश निश्चित झाल्याने स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे. अतुल मुंबई उपनगर, तर मनिष राव शहरचे प्रतिनिधित्व करणार असल्याने मुंबईकरांचे तगडे आव्हान स्पर्धेत असेल.
खुल्या व १७ वर्षांखालील गटाच्या या स्पर्धेत एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा लढती होतील. तसेच या स्पर्धेतून नोव्हेंबर महिन्यात जयपूर येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड होणार असल्याने स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळेल. (क्रीडा प्रतिनिधी)
उत्सुकता राज्य संघ निवडीची...
या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होणार असल्याने बलाढ्य संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल.
स्पर्धेतील सहभागी संघ...
अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, जालना, जळगाव, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सांगली, धुळे, नागपूर, यवतमाळ, नंदुरबार, वर्धा, परभणी, बीड, अमरावती, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, हिंगोली, भंडारा, अकोला आणि वाशिम.