पैठणच्या तीर्थस्तंभाला मिळणार झळाळी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:31 AM2019-01-15T00:31:37+5:302019-01-15T00:32:27+5:30
पैठणचे प्राचीन वैभव म्हणून ओळख असलेल्या येथील प्राचीन तीर्थस्तंभाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्यामुळे झिजत चाललेल्या या प्राचीन दगडी शिल्पाला नवी झळाळी मिळणार आहे. या निर्णयामुळे इतिहासप्रेमींना दिलासा मिळाला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
अंकुश वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठणचे प्राचीन वैभव म्हणून ओळख असलेल्या येथील प्राचीन तीर्थस्तंभाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्यामुळे झिजत चाललेल्या या प्राचीन दगडी शिल्पाला नवी झळाळी मिळणार आहे. या निर्णयामुळे इतिहासप्रेमींना दिलासा मिळाला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
या प्राचीन तीर्थस्तंभाकडे पुरातत्व विभागाने गेल्या ५० वर्षांत गांभीर्याने लक्ष न दिल्याने या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावर वेळोवेळी इतिहासप्रेमी नागरिकांनी पालिकेकडे केलेल्या मागणीमुळे या तीर्थस्तंभाला आधार मिळाला. पुरातत्व विभागाकडून लक्ष दिले गेले नसून राष्ट्रीय संपत्ती म्हणून फलक लावण्यापुरतेच काम केल्याचे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणातही स्थापनेपासून यासाठी ५० लाखांचा निधी राखीव होता; परंतु प्राधिकरण समितीनेही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निधी असूनही इतके दिवस नियोजनाअभावी काम रखडले
होते.
या तीर्थस्तंभात एकंदर चार भिन्न विभाग असून, प्रत्येक विभाग परस्परात सुव्यवस्थित बसविला आहे. तळाला सभा मंडप, सुरदार खांब आहेत. त्यामध्ये कोरलेले गाभारे व गाभाऱ्यातच मूर्ती बसविल्या असून, स्तंभ गोलाकार असला तरी सर्व शिल्पे चौकोनी आकारात आहेत. नऊ देवतांच्या एका मंडळापासून स्तंभास सुरुवात होते. मंडळातील नऊ प्रमुख देवतांमध्ये नृत्यरत गणेश, महेश आहेत. भैरवाच्या गळ्यातील रुद्रमाळा व रुद्र माळातून रक्त चाटणारा श्वान कलात्मक पद्धतीने दाखविण्यात आला आहे. मंडळानंतर मकर मुखपट्टीचा गोलाकार आहे, तसेच संस्कृतीच्या विविधतेची शिल्पे या स्तंभात साकारण्यात आली असल्यामुळे पैठणचे हे प्राचीन वैभव मानले जाते.
पैठणच्या प्राचीन संस्कृतीच्या इतिहासाची साक्ष देणारा हा तीर्थस्तंभ असून, पालिकेने आतापर्यंत देखभाल व दुरुस्ती केली आहे. प्राधिकरणातून यासाठी ५० ऐवजी ८० लाख रुपयांच्या निधीला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मान्यता दिली आहे. आर्किटेक्टने पाहणी केली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची पैठणकरांची ही मागणी पूर्ण होत आहे, असे नगराध्यक्ष तथा प्राधिकरण विकास समितीचे उपाध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले.