औरंगाबादची कन्या करणार ‘इंडिगो’च्या विमानाचे सारथ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:17 PM2020-02-04T17:17:06+5:302020-02-04T17:19:29+5:30
उद्यापासून इंडिगोचे मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी विमान
औरंगाबाद : औरंगाबादहून ‘इंडिगो’कडून ५ फेब्रुवारीपासून मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे ‘इंडिगो’च्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचे सारथ्य मराठवाड्यातील पहिल्या महिला वैमानिक कमांडर कीर्ती राऊत करणार आहेत.
कीर्ती राऊत या औरंगाबादेतील सदाशिव राऊत आणि जिजाबाई राऊत यांच्या कन्या आहेत. लहानपणी ‘मला विमान उडवायचे’ असे म्हणणाऱ्या कीर्ती पुढे चालून खरोखरच वैमानिक झाल्या. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दाखल झाल्या आणि स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली. कीर्ती राऊत यांचे वैमानिकाचे प्रशिक्षण डेहराडून, अहमदाबाद आणि फ्रान्स येथे झालेले आहे. त्या २००६ मध्ये किंगफिशर एअरलाईनमध्ये को-पायलट म्हणून रुजू झाल्या. वयाच्या अवघ्या २२ वर्षी वैमानिक होण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले होते. त्यानंतर एप्रिल २०१२ मध्ये त्या इंडिगो एअरलाईनमध्ये रुजू झाल्या. तेथे कमांडरची अंतर्गत परीक्षा पास झाल्या. सध्या त्या कमांडर म्हणून काम करीत आहेत.
इंडिगोकडून एखाद्या शहरासाठी पहिल्यांदाच नवीन विमान सुरू केले जात असेल, तर त्या विमानाचे सारथ्य करण्याची संबंधित शहरातील पायलटला संधी दिली जाते. औरंगाबादहून बुधवारपासून इंडिगोची मुंबई, दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरूहोत आहे. या तिन्ही मार्गांवर १८० आसनी एअरबसद्वारे ही सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई-औरंगाबाद-मुंबई या विमानाचे सारथ्य करण्याची संधी कीर्ती राऊत यांना मिळाली आहे. ही बाब मराठवाड्यासाठी मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे.
६ हजार तासांचा अनुभव
कीर्ती राऊत यांना तब्बल ६ हजार तास विमान चालविण्याचा अनुभव आहे. अनेक दिवसांपासून मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवेची प्रतीक्षा केली जात होती. ही प्रतीक्षाही आता संपणार आहे. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर तब्बल १० महिन्यांनंतर मुंबईसाठी सकाळच्या वेळेत इंडिगोच्या माध्यमातून नियमित विमानसेवा सुरू होत आहे.
मोठी संधी मिळाली
इंडिगोकडून पहिल्यांदाच औरंगाबादहून विमानसेवा सुरूकेली जात आहे. मुंबई-औरंगाबाद-मुंबई या पहिल्या विमानाचे सारथ्य करण्याची मी विनंती केली. औरंगाबादची कन्या असल्याने संधी दिली पाहिजे, म्हणून वरिष्ठांनी तात्काळ मंजुरी दिली. ही संधी मोठी वाटते.
- कीर्ती राऊत, कमांडर, इंडिगो एअरलाईन