अखेर पिंपळगावला मिळाले रोहित्र, वीज पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:43+5:302021-01-03T04:06:43+5:30
पिंपळगाव घाट गावात गेल्या महिनाभरापासून रोहित्र बिघडले होते. कधी लाईट सुरू व्हायची तर कधी अचानकच बंद होत असे, तर ...
पिंपळगाव घाट गावात गेल्या महिनाभरापासून रोहित्र बिघडले होते. कधी लाईट सुरू व्हायची तर कधी अचानकच बंद होत असे, तर चार दिवसांपूर्वी गावातील रोहित्र जळाले. त्यामुळे गाव पूर्णपणे अंधारात गेले होते. त्यात शेतात पिकांना पाणी मिळत नव्हते. पाण्याविना पीकही जळून खाक होण्याची भीती निर्माण झाली होती. याबाबत महावितरणच्या भराडी येथील कार्यालयात गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. अनेक वेळा खेटे मारावे लागले. एक प्रकारे दुर्लक्ष केले जात होते. तीन-चार दिवसांत नवीन रोहित्र बसवून वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर पिंपळगाव घाट येथील ग्रामस्थांनी भराडी येथील कार्यालयावर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता.
--------------
नागरिक म्हणतात....
आम्ही अनेक वेळा महावितरणकडे तक्रार करूनदेखील महावितरण याकडे दुर्लक्ष करीत होते. ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केल्याने रोहित्र बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना पाणी देणे सुरू झाले आहे, असे पिंपळगाव घाट येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम फरकाडे, प्रताप मुरमे यांनी सांगितले.
----------
फोटो : सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील रोहित्र बसविताना महावितरणचे कर्मचारी एस. एल. सपकाळ.