गुलाबी थंडीत धावले लहानथोर अन् युवा !; औरंगाबाद महामॅरेथॉनची उत्साहात सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 01:11 PM2017-12-17T13:11:21+5:302017-12-17T13:26:10+5:30

स्थळ विभागीय क्रीडा संकुल... सकाळी  ५ वाजेची वेळ... गुलाबी थंडी आणि मैदानावर धावण्याच्या उमेदीने पळणारे धावपटू... ‘माझ्या शहरासाठी अन् माझ्या उत्तम आरोग्यासाठी मी धावणार’.. या एकाच उद्देशाने धावपटू मैदानावर उपस्थित होते. कुणी ३ किमी, कुणी ५ तर कुणी २१ किमी धावण्यासाठी सज्ज होते. लोकमत आयोजित ‘महामॅरेथॉन’ या कार्यक्रमावेळी महिला, बच्चेकंपनी, युवांचा प्रचंड उत्साह दिसून आला. 

Pink cooler races short and young! Aurangabad expresses the enthusiasm of the great marathon | गुलाबी थंडीत धावले लहानथोर अन् युवा !; औरंगाबाद महामॅरेथॉनची उत्साहात सांगता 

गुलाबी थंडीत धावले लहानथोर अन् युवा !; औरंगाबाद महामॅरेथॉनची उत्साहात सांगता 

googlenewsNext
ठळक मुद्दे स्थळ विभागीय क्रीडा संकुल... सकाळी  ५ वाजेची वेळ आणि धावपटू ३ किमी, कुणी ५ तर कुणी २१ किमी धावण्यासाठी सज्ज होते.ज्येष्ठ नागरिकांबरोबरच लहान मुलेही मोठ्या उत्साहात आलेले दिसत होते. तसेच काही महिला पहिल्यांदाच या मॅरेथॉनमध्ये धावत होत्याकाही ठिकाणी शाळकरी मुले लेझीमसह सर्व धावपटूंचा जोम वाढवतांना दिसले. आपापले नियोजित टार्गेट पूर्ण करून मैदानाकडे आल्यानंतर प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद, समाधान दिसून येत होते. 

औरंगाबाद :  स्थळ विभागीय क्रीडा संकुल... सकाळी  ५ वाजेची वेळ... गुलाबी थंडी आणि मैदानावर धावण्याच्या उमेदीने पळणारे धावपटू... ‘माझ्या शहरासाठी अन् माझ्या उत्तम आरोग्यासाठी मी धावणार’.. या एकाच उद्देशाने धावपटू मैदानावर उपस्थित होते. कुणी ३ किमी, कुणी ५ तर कुणी २१ किमी धावण्यासाठी सज्ज होते. लोकमत आयोजित ‘महामॅरेथॉन’ या कार्यक्रमावेळी महिला, बच्चेकंपनी, युवांचा प्रचंड उत्साह दिसून आला. 

विभागीय क्रीडा संकुल मैदान येथे भल्या पहाटे लहाने मुले, महिला, युवा, वयोवृद्ध हे प्रचंड संख्येने गर्दी केली होती. धावण्याअगोदर ‘वॉर्म अप’ करण्यात सर्वजण मग्न होते. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच लहान मुलेही मोठ्या उत्साहात आलेले दिसत होते. तसेच काही महिला पहिल्यांदाच या मॅरेथॉनमध्ये धावत होत्या. तरीही त्यांच्या चेह-यावर थकवा, मरगळ कुठेच दिसत नव्हती. जिंकण्याचा अट्टाहास कुणाचाच नव्हता. प्रत्येक जण स्वत:साठी, स्वत:च्या आरोग्यासाठी धावत होता. त्यामुळे चेह-यावर हास्य ठेवून आणि एकमेकांच्या साथीने, उमेदीने सर्व धावत होते. महामॅरेथॉनच्या नियोजित मार्गावर ठिकठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. पाणी, हेल्थ ड्रिंक्स यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच धावपटूंना चिअर अप करण्यासाठी रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या स्टेजवर देशभक्तीपर गीते म्हणण्यात येते होते. त्यामुळे धावपटूंमध्येही उत्साह आणि जोश निर्माण होत होता. काही ठिकाणी शाळकरी मुले लेझीमसह सर्व धावपटूंचा जोम वाढवतांना दिसले. आपापले नियोजित टार्गेट पूर्ण करून मैदानाकडे आल्यानंतर प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद, समाधान दिसून येत होते. 

रॉक बँडने वाढविला स्पर्धकांचा उत्साह
ऐतिहासिक स्थळांच्या छायाचित्रांचा भव्य मंच...अन् रॉक बँड ग्रुपतर्फे सादर होणारी जल्लोषपूर्ण गीते, सोबत प्रसिद्ध कार्टुन्सच्या वेशभुषेत सहभागी कलावंत आणि उपस्थित नागरिकांकडून दिले जाणारे प्रोत्साहन... अशा उत्साही वातावरणाने लोकमत भवन परिसरात स्पर्धकांना धावण्यासाठी अनोखी उर्जा मिळाली. लोकमत भवन परिसरात जालना रोडवर पहाटे ५.३० वाजेपासूनच महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी थांबले होते. येथे उभारण्यात आलेल्या मंचावर नोबीयन्स रॉक बँड ग्रुपने एकाहून एक सरस गीत सादर करून वातावरणात रंग भरला. तर कार्टुन्सच्या वेशभुषेतील कलावंतांनी धावपटूंच्या चेह-यावर स्मीत आणत धावण्यासाठी स्फुर्ती दिली.

या ठिकाणाहून अंतिम टप्पा अवघ्या काही अंतरावर असल्याने पुढे जाण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू होती. स्पर्धकांमध्ये युवक- युवतींसह लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग लक्षणीय होता. इतरांप्रमाणेही पुढे जाण्यासाठी, लवकरात लवकर अंतर पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठांचाही प्रयत्न सुरू असल्याचे दिसले. धावतांना त्यांच्या चेह-यावर थोडाही थकवा जाणत नव्हता. ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र असलेल्या भव्य मंचासमोर अनेक स्पर्धकांनी क्षणभर थांबून सेल्फी काढली. २१ कि.मी. स्पर्धेत बिब नंबर २१४३३, २१४०६,२१३९४,२१०३१ या स्पर्धकांमध्ये विजय मिळविण्यासाठी चुरस पहायला मिळाली.

अबालवृद्धांनी गाजवले ३ किलोमिटरचे मैदान
लोकमत महामॅरेथॉनमधील ३ किलोमीटरच्या स्पर्धेत अबालवृद्धांनी सहभाग नोंदवत ‘हम भी किससे कम नही’ हे दाखवून दिले. ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या अतषबाजीमुळे धावपटूंना प्रोत्साहन मिळत होते. लोकमत महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरमध्ये सहभागी झालेले धावपटू अर्ध्यात पोहचले होते. १० किलोमीटरसाठी धावपटूंनी नुकतेच प्रस्थान केले होते. ५ किलोमीटरमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूंची धावपळ सुरु असतानाच ३ किलोमीटरमधील सहभागी होणा-या धावपटूंची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मैदानात सर्वत्र मॅरेथॉन फिव्हर होता. यातच शेवटच्या टप्प्यातील उत्साही धावपटूंना एक-एक मिनिट कधी संपतो आणि एकदाच धावण्यास कधी सुुरुवात करतो, अशी उत्सुकता दाटून आलेली होती. यातच ७.१० मिनिटांचा ठोका पडताच प्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी हिरवा झेंडा दाखवताच ३ किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुुरुवात झाली.

३ किलोमीटरमध्ये बहुतांश १५ वर्ष वयोगटाखालील बालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची सर्वांधिक गर्दी होती. ढोल पथकाचा निनाद, फटाक्यांची अतषबाजीत धावपटूंनी अंतर कापण्यास सुुरुवात केली. या ३ किलोमिटरच्या स्पर्धेत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमत संखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, ब्रिगेडियर डी. के. पात्रा, कर्नल कर्णिक यांच्यासह शेकडो धावापटूंनी सहभाग घेतला. यात सर्वांधिक संख्या ही १५ वर्षांखालील बालकांची होती. यात ५ वर्षांच्या अनेक मुलांचाही समावेश होता. तर सेवानिवृत्त झालेल्या वृद्धांनी उत्सफुर्तपणे या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वृद्धांच्या सहभागामुळे युवकांना चांगलीच प्रेरणा मिळाली. अनेकजण एकमेकांना धावण्यासाठी प्रोत्साहन देत होते. तर ठिकठिकाणच्या ढोलपथकांमुळे धावपटूंनाही धावण्यासाठी प्ररेणा मिळत होती. 

देश-विदेशातील धावपटूंनी घेतला भाग
लोकमत महामॅरेथॉनमध्ये देश, विदेशातील धावपटूंनी २१ किलोमीटरमध्ये सहभाग नोंदवत बक्षिसांची लायलूट केली. केनियाची धावपटू ब्रिगीड किमीतवार हिने फॉरेन गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर अमेरिकाच्या लॉरेन्स से नेक यांच्यासह चायना, केनिया, भूतान, मलेशिया आदी देशातील धावपटंूनी क्रमांक पटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यासह देशातील भोपाळ, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद आदी शहरातील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले. तर राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सातारा, नागपूर, अकोला, लातूर, परभणी, नांदेड, उदगीर, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी शहरांसह ग्रामीण भागातील धावपटू सहभागी झाले होते. महामॅरेथॉनमधील बहुतांश बक्षिसे ही राज्यातील विविध शहरातुन आलेल्या धावपटूंनीच पटकावली आहेत.

लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यांना येवून जोडणा-या छोट्या-छोट्या रस्त्यांवरून सकाळी ५.३० वाजता वाहतूकीला सुरूवात झाली. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीसांनी अत्यंत चोखपणे काम केले. स्पर्धेच्या निमित्ताने काही तासांसाठी वाहतूक वळविण्यात आल्याचे वाहतूक पोलीस, स्वयंसेवक सांगत होते. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनीही लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचे स्वागत करीत आपली वाहने वळवून घेतली. आमखास मैदान, किलेअर्क, लेबर कॉलनी आदी भागात हे चित्र पहायला मिळाले. आमखास मैदानाजवळील कॅन्सर हॉस्पीटल चौकात स्पर्धकांचे स्वागत ठोल-ताशांच्या गजरात करण्यात येत होते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही स्पर्धेचे कौतूक केले. रस्त्याच्या कडेला उभे राहुन बच्चे कंपनी स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करीत होती.

महापालिकेचे सहकार्य
लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेसाठी एक महिना आधीच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठक घेवून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शहरात दाखल होणा-या आंतरराष्टÑीय, राष्टÑीय स्पर्धकांना कोणताच त्रास होणार नाही, याची संपुर्ण काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व त्यांच्या सर्व सहकार्यांनी २१ किलोमिटर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, साफसफाई, विद्युत व्यवस्था आणि पाणीपुरवठा विभागानेही चोखपणे सर्व व्यवस्था केली.

Web Title: Pink cooler races short and young! Aurangabad expresses the enthusiasm of the great marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.