गुलाबी नोटा खिशात नव्हे तिजोरीत! २ हजारांच्या नोटा बाजारात मिळणे झाले दुर्मीळ
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 8, 2022 04:05 PM2022-11-08T16:05:52+5:302022-11-08T16:06:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५०० व २,००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : नोटबंदीनंतर जारी केलेल्या दोन हजारांच्या गुलाबी नोटा जेवढ्या वेगाने बाजारात दाखल झाल्या तेवढ्याच वेगाने गायब झाल्या. रिझर्व्ह बँकेने या नोटा छपाई बंद केली, पण व्यवहारातून नोटा बाद केल्या नाहीत, असे स्पष्ट केले, पण व्यवहारातही या नोटा दुर्मीळ झाल्या आहेत. बँकेत नाही, एटीएममध्ये नाही, बाजारात नाही, खिशात नाही मग या गुलाबी नोटा गेल्या कुठे...? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या नोटा लोकांनी तिजोरीत साठा करून ठेवल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५०० व २,००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या. त्यावेळी ज्याच्या त्याच्या हातात या गुलाबी नोटाच दिसत होत्या, पण मागील तीन-चार वर्षांत या नोटा बाजारातून अचानक गायब झाल्या आहेत. शहरातील जाधववाडी, जुना मोंढा, पेट्रोलपंप व काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आज चौकशी केली असता, या नोटा आढळल्या नाहीत.
पेट्रोलपंप मालक हितेश पटेल यांनी सांगितले की, जेव्हा २,००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या त्यानंतर कार ते मालट्रक या डिझेल घेणाऱ्या सर्वांकडे दोन हजारांच्या नोटा दिसत होत्या. जे एका वेळी ७५ ते २५० लिटर डिझेल भरत त्यांच्याकडे २ हजारांच्याच नोटा असत. दिवसभरात एका पंपावर ४० ते ५० या नोटा येत असत, मात्र, आता महिनाभरात ३ ते ४ गुलाबी नोटा कौंटरमध्ये बघण्यास मिळतात. मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, आमच्या काैंटरला १५ दिवसांत एखाद्या ग्राहक दोन हजारांची नोट घेऊन येतो. बहुतेक गुलाबी नोटा बड्या लोकांच्या तिजोरीत जमा झाल्याची व्यापारी वर्तुळात आहे.
चार वर्षांपासून या नोटाचे दर्शन झाले दुर्लभ
२०१७-२०१८ दरम्यान २ हजारांच्या नोटा बँकांतून व एटीएममधून मिळत होत्या, मात्र, २०१८ नंतर त्यांचे प्रमाण कमी झाले. आता तर एटीएममधूनही या गुलाबी नोटा मिळत नाहीत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये २ हजारांच्या नोटा ३३,६३० लाख नोटा चलनात होत्या. या नोटांसाठी वापरलेला कागद खराब असल्याने त्या लवकर खराब झाल्या. त्या रिझर्व बँकेने परत घेतल्या. बाकीच्या नोटा व्यवहारातच आहे.
नोटाची छपाई बंद, पण नोटा चलनात
रिझर्व्ह बँकेने मागे जाहीर केले होते की, २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे, पण बाजारात या नोटा चलनात आहेत. त्या रद्द केलेल्या नाहीत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडे न पाठविता बँकांनी व्यवहारात चालवाव्यात, असे आदेश दिले आहेत. आमच्याकडे ग्राहकांकडून येणाऱ्या २ हजारांच्या नोटा आम्ही मागणी करणाऱ्या खातेदाराला देतो. बँक या नोटा साठवून ठेवत नाही.
- हेमंत जामखेडकर महासचिव, सीबीआयईए
साठवून न ठेवता व्यवहारात आणाव्यात
२ हजारांच्या नोटा चलनात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून येत नसल्याने या नोटा आम्ही एटीएममध्ये टाकत नाही, मात्र, ग्राहकांकडून आलेल्या नोटा दुसऱ्या ग्राहकांना आम्ही देतो. आता या नोटा अत्यंत कमी प्रमाणात बँकेत येत आहेत. नागरिकांनी या नोटा तिजोरीत न ठेवता व्यवहारात आणाव्यात
- वामन श्रीपाद, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय (करन्सी चेस्ट)