स्वच्छतेसाठी पालिकेचे अॅप..!
By Admin | Published: January 17, 2017 12:38 AM2017-01-17T00:38:54+5:302017-01-17T00:39:30+5:30
जालना : शहरातील वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगर पालिकेने पुढाकार घेतला आहे.
जालना : शहरातील वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. शहर स्वच्छतेची माहिती तात्काळ मिळावी म्हणून पालिका नवीन मोबाईल अॅप्लीकेशन सुरू करत आहे. यासंबंधीची मुंबई येथील एका एजन्सीसोबत चर्चा झाली. तर घंटागाड्यासह स्वच्छता वाहनांवर जीपीएस यंत्रणाही लवकरच कार्यान्वित होणार आहे.
सोमवारी नगर पालिकेत मुख्याधिकारी व संबंधित जीपीएस यंत्रणा पुरविणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांसोबतच चर्चा झाली. यात जीपीएस यंत्रणा कशी कार्यान्वित होईल. या संबंधिची संगणक तसेच मोबाईलवर माहिती देण्यात आली. जीपीएस यंत्रणेचा रोड मॅप सोबतच लोकेशनही तात्काळ कळणार आहे. सर्व जीपीएस यंत्रणा नगर पालिकेतील सर्व्हर तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये कार्यान्वित असणार आहे. जीपीएस यंत्रणेसाठी आॅनलाईन टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. नेमका खर्च किती आहे याबाबत सभागृहाच्या निर्णयावरच ठरणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गुगल मॅपद्वारे ही सर्व प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत माहिती दिली. येत्या काही दिवसांत प्रत्येक घंटागाडी तसेच स्वच्छता वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होईल.
सोबतच शहरातील घंटागाड्यांची माहिती नागरिकांना मिळावी, पालिकेचे मुख्याधिकारी तसेच स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनाही शहर स्वच्छतेबाबतची वास्तव स्थिती कळावी म्हणून पालिका मोबाईल अॅप्लीकेशन तयार करत आहे. याबाबतही तंत्रज्ञासोबत चर्चा झाली असून, पालिकेच्या या हायटेक कामामुळे शहर स्वच्छ व सुंदर होणार असे चित्र आहे.