पीटलाईन चिकलठाण्यात की जालन्यात? खासदारांच्या बैठकीकडे अवघ्या मराठवाड्याचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 06:20 PM2021-10-18T18:20:37+5:302021-10-18T18:31:00+5:30
Railway Pitline अंदाजे दोन दशकांनंतर रेल्वेची बैठक औरंगाबादेत होत असून, यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद : रेल्वेची पीटलाईन ( Railway Pitline ) चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही रेल्वे प्रशासनाने हाती घेतले. मात्र, चिकलठाण्यात रेल्वेची जागा अपुरी पडत आहे. राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी नुकतेच स्पष्ट केले. त्याच वेळी जालन्यातही पीटलाईनसाठी जागेची पाहणी झाली. मराठवाड्यासह मनमाड, अकोला, मध्य प्रदेशातील काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक २० ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत घेण्यात येणार आहे. या बैठकीतून पीटलाईनसह मराठवाड्याच्या पदरी काय पडते, याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
अंदाजे दोन दशकांनंतर रेल्वेची बैठक औरंगाबादेत होत असून, यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यातही बहुतांश एकेरी मार्गच आहेत. परिणामी, रेल्वेगाड्यांची संख्याही कमी आहे. नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच वर्षानुवर्षे निघून गेली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांना रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले आणि वर्षानुवर्षे रेल्वे प्रश्नांसाठी झगडणाऱ्या अवघ्या मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाल्याने वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न आता ‘फास्ट ट्रॅक’वर येतील आणि मराठवाड्यात रेल्वेचा विकास होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. त्याबरोबरच लोकप्रतिनिधींच्या बैठकीतूनही काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना बोलवा
खासदारांच्या बैठकीतून पीटलाईनसह इतर प्रश्नांवर निर्णय होण्याची आशा आहे. बैठकीत काही निर्णय झाले नाही, तर रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली जाईल. जनशताब्दी एक्स्प्रेस हिंगोलीहून सोडण्यास विरोध नाही; परंतु औरंगाबादहून मुंबईसाठी आधी सुपरफास्ट रेल्वे सुरू केली पाहिजे. रोटेगाव- कोपरगाव, औरंगाबाद- चाळीसगाव हे मार्ग मध्य रेल्वेच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनाही बोलावले पाहिजे, असे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.
प्रलंबित रेल्वे प्रश्न, मागण्या :
१) रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग.
२) औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव मार्ग.
३) सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद- बीड- गेवराई व्हाया पैठण- औरंगाबाद- जळगाव मार्ग.
४) जालना- खामगाव रेल्वे मार्ग.
५)औरंगाबाद- नगर मार्ग.
६)औरंगाबादेत पीटलाईन.
७) औरंगाबाद माॅडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा.
८) शिवाजीनगर भुयारी मार्ग.
९) जालना येथे मेमू कार शेड.