‘दमरे’त ३७ पीटलाईन, सर्व निकष पूर्ण करूनही औरंगाबादेत ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:59 PM2019-09-03T13:59:50+5:302019-09-03T14:03:15+5:30
नवीन करा अथवा जुन्या पीटलाईनचा विकास करण्याची मागणी
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतील विविध विभागांमध्ये तब्बल ३७ ठिकाणी पीटलाईन आहेत; परंतु वर्षानुवर्षे मागणी करूनही जागेचे कारण पुढे करून औरंगाबादेत पीटलाईन करण्याला ‘खो’ दिला जात आहे. परिणामी, देखभाल-दुरुस्तीसह औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण येत आहे.
मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी, औद्योगिक, शैक्षणिक केंद्र असलेले औरंगाबाद मर्यादित रेल्वे जाळ्यांमुळे मागे पडत आहे. औरंगाबादहून विविध शहरांसाठी नवीन रेल्वे सुरू करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. सध्या शहरातून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी, देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेस आहे. या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची गर्दी पाहता मुंबईसह देशातील शहरांसाठी रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे; परंतु पीटलाईन नसल्याचे कारण पुढे करून रेल्वे सुरू करण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद अथवा चिकलठाणा येथे पीटलाईन झाल्यास लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यासाठी हालचालीही झाल्या. चिकलठाण्यात २० बोगींची पीटलाईन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, पीटलाईनचा प्रस्ताव अपुरी जागा, पाणी यासह अनेक कारणांनी मागे टाकण्यात आला.एकीकडे नवीन पीटलाईन केली जात नाही. दुसरीकडे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील जुनी पीटलाईन अनेक वर्षांपासून बंद आहे. किमान ती तरी कार्यान्वित करण्याची मागणी रेल्वे संघटनांकडून होत आहे.
जागेअभावी अशक्य
दमरेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा म्हणाले, जागेअभावी पीटलाईन करणे अशक्य होत आहे. नव्या रेल्वेसाठी पीटलाईनचा कोणताही अडथळा नाही. मात्र, प्रवासी संख्या वाढली तर नव्या रेल्वे सुरू होतील.
नांदेड विभागात ४ पीटलाईन
नांदेड विभागात नांदेड येथे ३, पूर्णा येथे १ पीटलाईन आहे, तर हैदराबाद, सिंकदराबाद, काचिगुडा, विजयवाडा, गुंटूर आदी ठिकाणी एकूण ३७ पीटलाईन आहेत. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले की, नव्या रेल्वेंसाठी पीटलाईन होणे गरजेचे आहे. विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भावेश पटेल म्हणाले, नवीन अथवा जुनी पीटलाईन सुरू केली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा के ला पाहिजे.
निकष पूर्ण करणारे शहर
‘दमरे’च्या मुख्यालयाकडून २०१७ मध्ये पीटलाईनला मंजुरी मिळाली होती; परंतु पुढे ती अडवली गेली. संपूर्ण दमरे झोनमध्ये औरंगाबाद हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. औरंगाबाद शहर पीटलाईनसाठीचे सर्व निकष पूर्ण करते. ‘दमरे’मध्ये ३७ ठिकाणी पीटलाईन आहेत, असे बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील संशोधक स्वानंद सोळंके म्हणाले.