कन्नड येथे सर्व्हिस रोडवरील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:27+5:302021-05-22T04:05:27+5:30
शिऊरकडून कन्नडकडे येणाऱ्या वाहनांसाठी पाणपोईपासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सर्व्हिस रोड ६ महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर थोड्याच ...
शिऊरकडून कन्नडकडे येणाऱ्या वाहनांसाठी पाणपोईपासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सर्व्हिस रोड ६ महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर थोड्याच दिवसात सुमारे २ फूट रुंदीचा व १० ते १२ फूट लांबीचा आडवा खड्डा पडला आहे. अंदाजे दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत महामार्गावरील अपघात स्थळांबाबत कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत हा खड्डा तत्काळ बुजविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तथापि दोन महिने उलटूनही हा खड्डा तसाच आहे. लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यापूर्वी हा खड्डा बुजविणे आवश्यक आहे, अन्यथा या खड्ड्याचे स्वरूप मोठे होऊन नवीन अपघातस्थळ तयार होईल. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हा खड्डा तत्काळ बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. महामार्गावरील अपघातस्थळांबाबत, दिशादर्शक फलक याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात खड्ड्यांकडेही दुर्लक्ष करणे ही चिंताजनक बाब असल्याचे माजी नगरसेवक रत्नाकर पंडित यांनी सांगितले.
फोटो :