जालना अन् चिकलठाण्यातही पीटलाइन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा राजकारण शमविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 01:25 PM2022-02-10T13:25:57+5:302022-02-10T13:28:18+5:30
चिकलठाणा येथे पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
औरंगाबाद : औरंगाबादेतील चिकलठाणा येथील पीटलाइन जालन्याला पळविण्यात येत असल्याची ओरड होत असताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा दिला. या दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी औरंगाबादेतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिली. दोन्ही जिल्ह्यांना पीटलाइनचा शब्द देऊन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी पीटलाइनवरून सुरू असलेले राजकारण शमविण्याचा प्रयत्न केला.
उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, विवेक देशपांडे, डाॅ. फडके आणि भाजपच्या विजया रहाटकर यांनी बुधवारी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांविषयी संवाद साधला. यावेळी पीटलाइनसह औरंगाबाद-नगर रेल्वे मार्ग, जालना-जळगाव रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव मार्ग आदींवर चर्चा झाली. उद्योजकांना नजरेसमोर ठेवून औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाइन करण्याची मागणी करण्याचा पवित्रा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतला. त्यापाठोपाठ चिकलठाण्यातच पीटलाइन व्हावी, या मागणीसाठी चिकलठाणा येथील ग्रामस्थही पुढे आले.
रेल्वे प्रश्नांवर संवाद
विविध रेल्वेप्रश्नांवर संवाद साधला. चिकलठाणा आणि जालना या दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरु आहे. उद्योजकांच्या सुविधेच्या दृष्टीने हा मार्गही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- राम भोगले, उद्योजक