गोळेगाव-आनवा रस्त्यावर जागोजागी खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:04 AM2021-04-05T04:04:17+5:302021-04-05T04:04:17+5:30
सिल्लोड : पानवडोद मार्गे गोळेगाव ते आनवा या दहा किलोमीटर रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडले असून, वाहनधारकांना ...
सिल्लोड : पानवडोद मार्गे गोळेगाव ते आनवा या दहा किलोमीटर रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडले असून, वाहनधारकांना येथून वाहन घेऊन जाताना मरणयातना भोगाव्या लागत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्यावरील डांबर व खडी उखडल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत.
ऐतिहासिक गाव व मंदिराची नगरी अशी ओळख असलेल्या आनवा गावात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, आजूबाईचे मंदिर, ऐतिहासिक मठ व भव्य अरबी मदरसा सारख्या वास्तू असल्याने राज्यभरातील भाविक इतिहासप्रेमी व विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. परंतु, या सर्वांना येथून जाताना मार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्या. परंतु, या विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे मजबुतीकरणासाठी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दहा किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यावरून वाहन घेऊन जाताना अर्धा ते पाऊण तास लागतो. येथून वाहन चालविताना जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. जीवघेणा खेळ असा किती दिवस करावा लागणार आहे, संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. - शेख खलील अहेमद, नागरिक.
फोटो : गोळेगाव ते आनवा रस्त्याची झालेली दुर्दशा.