खड्डे, चुकीच्या गतिरोधकांनी नागरिकांचे आरोग्य ‘फ्रॅक्चर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 06:32 PM2020-02-11T18:32:05+5:302020-02-11T18:38:11+5:30
‘आयएमए’कडे डॉक्टरांनी नोंदविले निरीक्षण
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहर व परिसरातील रस्त्यारस्त्यांवर चुकीच्या आणि अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक टाकण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, औरंगाबादकरांची हाडे खिळखिळी होत आहेत. गेल्या काही महिन्यांत मान, पाठ, कंबरदुखीसह मणका दबण्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण शहरातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (आयएमए) नोंदविले आहे.
रस्त्यांवर वाढणाऱ्या अपघातांना, वाहनांच्या अतिरिक्त वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक महत्त्वाची भूमिका निभावतात. रस्त्यांवरील गतिरोधक कसे असावेत, त्याची उंची, रुंदी किती असावी, कोणत्या रस्त्यावर कसे गतिरोधक असावते, याविषयी ‘इंडियन रोड काँग्रेस’ने (आयआरसी) काही निकष निर्धारित केले आहेत. त्याप्रमाणेच गतिरोधक असणे आवश्यक आहे. परंतु शहरात अनेक भागांत गतिरोधकांची उभारणी करताना केराची टोपली दाखवल्याची ओरड होत आहे. अशास्त्रीय गतिरोधकाची उंची जास्त असते. त्यामुळे मागील चाक त्यावरून उतरताना आदळले जाते. त्यामुळे मणक्यांना इजा होण्याचा धोका वाढतो. या परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळेही ही समस्या उद््भवते. गतिरोधक, रस्त्यातील खड्ड्यांमुळे गरोदर महिलांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. डॉक्टरांच्या निरीक्षणावरून, रुग्णांच्या तक्रारीवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचे दिसते.
...तर २५ टक्के अधिक धोका
गतिरोधकाची रचना, गतिरोधकावरून जाताना वाहनाचा वेग, चालकाची शारीरिक स्थिती आणि वाहनाची परिस्थिती हे चार कोन व्यवस्थित असतील, तर मणका लवकर खिळखिळा होत नाही. ४एखाद दोन वेळा अशा चुकीच्या गतिरोधकांवरून ये-जा केल्याचा परिणाम होत नाही. परंतु यातील एक बाब जरी चुकली, तरीही पाठीचा विकार होण्याची स्थिती २५ टक्क्यांनी वाढते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
प्रशासनाची चूक
खड्डे, गतिरोधकांमुळे पाठीचा त्रास, मणक्याचे फ्रॅक्चर होण्याचे प्रकार होत आहेत. अनेक डॉक्टर यासंदर्भात ‘आयएमए’कडे तक्रारी, निरीक्षण नोंदवीत आहेत. गर्भवती महिलांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. एखाद्या गतिरोधकावरून जाताना वाहन अधिक आदळत असेल तर ते चुकीच्या पद्धतीचे गतिरोधक असल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाच्या एका चुकीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
- डॉ. यशवंत गाडे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन
रुग्णांकडून अनुभव कथन
ज्येष्ठ नागरिकांची हाडे ठिसूळ असतात. गतिरोधक, खड्ड्यात वाहन आदळल्याने अशी हाडे फ्रॅक्चर होण्याचे प्रकार होतो, अनेकदा मणका दबल्या जातो. मानेचा, कं बरेचा त्रास वाढतो, अशा तक्रारी घेऊन अनेक रुग्ण येतात.
गतिरोधकावर वाहन आदळल्याने त्रास झाल्याचे रुग्ण सांगतात.
- डॉ. चंद्रकांत थोरात, विभागप्रमुख, अस्थिव्यंगोपचार, घाटी