जागा उपलब्ध पण मान्यतेचे प्रस्ताव पडून; प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्रे सुरू होण्याची चिन्हे धूसर
By विजय सरवदे | Published: March 5, 2024 04:35 PM2024-03-05T16:35:19+5:302024-03-05T16:36:31+5:30
राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाकडे मागील चार महिन्यांपासून या प्रक्रिया केंद्रांच्या मान्यतेचे प्रस्ताव पडून आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन कक्षाला प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जिल्ह्यातील ९ मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अखेर जागा उपलब्ध झाल्या. परंतु, राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाकडे मागील चार महिन्यांपासून या प्रक्रिया केंद्रांच्या मान्यतेचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत ही केंद्रे कार्यान्वीत होण्याची चिन्हे आता धूसर झाली आहेत.
जिल्ह्यातील सर्वच गावे कचरामुक्त, हागणदारीमुक्त होण्यासाठी शासनाने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे जि.प. स्वच्छ भारत मिशन कक्षाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड ग्रामपंचायतीने बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणे, त्याचे विलगीकरण करून प्रक्रिया करण्यात आघाडी घेतली असून राज्यानेही याची दखल घेतली आहे. असे असले तरी जिल्ह्यात ८७० पैकी अवघ्या ८-१० एवढ्याच ग्रामपंचयतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर काम सुरू आहे.
दरम्यान, आता गावांमध्येही प्लास्टिक कचरा निर्मूलनाची मोहीम गतिमान व्हावी, यासाठी राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने जि.प.ला निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांत प्रत्येकी एका मध्यवर्ती अथवा मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जागांची शोध मोहीम हाती घेतली. दोन-तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता कुठे त्यासाठी जागा उपलब्ध झाल्या. पण, चार महिन्यांपासून या प्रस्तावांना मान्यताच मिळालेली नाही. प्लास्टिक प्रक्रिया केंद्रासाठी शासनाकडून प्रत्येकी १६ लाखांचा निधीही मिळणार आहे. या प्रस्तावांना मान्यता मिळाली असती, तर मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील ९ प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी शासनाचा हा निधी प्राप्त झाला असता. आता १५ मार्चपर्यंत कधीही निवडणूक आचार संहिता लागू शकते. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत आता ही केंद्रे कार्यान्वीत होतील, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
तालुका- नियोजित केंद्र
छत्रपती संभाजीनगर - लाडसावंगी
फुलंब्री- नायगाव
सिल्लोड- उंडणगाव
सोयगाव- जरंडी
कन्नड- नादरपूर
खुलताबाद- कागजीपुरा
गंगापूर- इटावा
वैजापूर- लासूरगाव
पैठण- घारेगाव