आरक्षण ‘ड्रॉ’नंतर आराखडा; बोगस प्रभाग रचनेची सोशल मीडियात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 04:47 PM2019-12-11T16:47:00+5:302019-12-11T16:52:06+5:30
आयोगाच्या अत्यंत गोपनीय कारभाराला छेद देण्याचे काम सोशल मीडियावर सुरू आहे.
औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोग प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी तयारी करीत आहे. महापालिकेने तयार करून दिलेला प्रभाग रचनेचा आराखडा अद्याप आयोगाने प्रसिद्ध केला नाही. डिसेंबरअखेरपर्यंत आयोग महापालिकेला वॉर्ड आरक्षणासाठी ड्रॉ घ्या, असा आदेश देणार आहे. त्यानंतर आराखडा प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेपूर्वीच आयोगाच्या अत्यंत गोपनीय कारभाराला छेद देण्याचे काम सोशल मीडियावर सुरू आहे. प्रभाग रचनेचा बोगस आराखडा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सादर केला. या समितीने आराखडा आयोगाकडे पाठवून दिला आहे. प्रारूप आराखडा तयार करताना आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयोग सध्या आराखड्यावर काम करीत आहे. त्यामध्ये किंचित फेरबदल आयोगाकडून अपेक्षित आहेत. २०११ च्या जनगणनेला डोळ्यासमोर ठेवूनच प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला आहे. एक प्रभाग तयार करताना किमान ४० हजार लोकसंख्या गृहीत धरली आहे. १ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉग असतो. एखाद्या प्रभागात लोकसंख्या जास्त होत असल्यास एक किंवा दोन हजारांचा ब्लॉग दुसऱ्या प्रभागात टाकण्याची मुभा आहे, असेही सूत्रांनी नमूद केले. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाचे काम सुरू आहे. लवकरच महापालिकेला वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम आयोगाकडून मनपाला देण्यात येणार आहे. सोडत काढल्यावर लगेच प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध होईल. वॉर्ड आरक्षण आणि प्रभाग रचनेवर सूचना-हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर मागील तीन दिवसांपासून एक यादी चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या यादीत प्रभाग रचना कशी असेल यावर भर देण्यात आला आहे. २०१५ मध्ये मनपाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील वॉर्डांच्या पूर्व-पश्चिम दिशा, हद्द, वॉर्डात समावेश होणाऱ्या वसाहती जशास तशा कॉपी करून टाकण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या बोगस प्रभाग रचनेच्या आराखड्यात अनेक वॉर्डच गायब करण्यात आले आहेत. याची सत्यता तपासण्यासाठी पत्रकारांनी मनपाच्या निवडणूक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी नमूद केले की, सोशल मीडियावर फिरणारी यादी बोगस आहे. ही यादी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे.
आयोगाकडून प्रभाग रचना प्रसिद्ध नाही
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचा कोणताही आराखडा अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. लवकरच तो प्रसिद्ध होईल. आयोगाकडून अधिकृतपणे वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यासाठी पत्र येईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
- मंजूषा मुथा, उपायुक्त, मनपा.