प्रेयसीच्या आईवडिलांना अडकविण्याचा डाव, मित्राला जाळून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:35 AM2024-11-05T11:35:49+5:302024-11-05T11:37:04+5:30

आपला मृतदेह भासवण्यासाठी मित्राचा खून केल्यानंतर मृतदेहाला स्वत:चेच कपडे घातले, खिशात आधार कार्ड ठेवले

Plan to trap girlfriend's parents, youth murdered and burn close friend, put his Aadhar card inside cloth | प्रेयसीच्या आईवडिलांना अडकविण्याचा डाव, मित्राला जाळून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

प्रेयसीच्या आईवडिलांना अडकविण्याचा डाव, मित्राला जाळून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीच्या कुटुंबाचा लग्नास विरोध, सतत जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे प्रियकराने स्वत:च्याच हत्येचा बनाव रचला. जिवलग मित्राची क्रूर हत्या करून स्वत:च्या हत्येचा बनाव रचला. ओळख नष्ट करण्यासाठी त्याला जाळून प्रियकर-प्रेयसी पसार झाले. शनिवारी सारंगपूर शिवारात घडलेल्या या सिनेस्टाइल हत्येचा पोलिसांनी ७२ तासांत उलगडा करत तिघांना अटक केली. महेश रमेश माठे (२०), त्याची प्रेयसी माधुरी चावरिया पिंपळे (१९) व किशोर रमेश बर्डे (२२) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत.

गंगापूर तालुक्यातील सारंगपूरमध्ये शनिवारी तरुणाचा क्रूरपणे हत्या करून जाळलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ, गंगापूर ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पॅण्टच्या खिशातील पाकिटात महेश ताठे नावाचे आधार, पॅनकार्ड, मोबाइल आढळला. त्यावरून प्राथमिक तपासात महेशची हत्या झाल्याचा समज झाला. त्याच्या कुटुंबाला ही बाब कळाल्यानंतर मृतदेहाचे कपडे, चपलांवरून त्यांनाही महेशच असल्याचे वाटले. परंतु मृतदेह काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तो महेश नसल्याचे स्पष्ट झाले व हत्येचे गूढ आणखी वाढले.

मिसिंगवरून ओळख पटली
दरम्यान, शहापूरमधील अमोल शिवनाथ उघडे (१७) हा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या कुटुंबाला पाचारण केल्यावर अमोलचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या सूचनेवरून तीन पथकांनी समांतर तपास सुरू केला. यात हत्येच्या काही तास आधी अमोल महेशसोबत दिसल्याची बाब पोलिसांना कळाली. सहायक निरीक्षक पवन इंगळे, उपनिरीक्षक प्रमोद काळे, लहू थोटे, वाल्मीक निकम, रवी लोखंडे यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात महेश, माधुरी रविवारी बारामतीमध्ये लपल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ रवाना होत दोघांना बसस्थानकावरून अटक केली.

...आणि हत्येचा कट उघड झाला
चौकशीत महेश, माधुरीने किशोरच्या मदतीने अमोलच्या हत्येची कबुली दिली. महेश, माधुरीचे काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या कुटुंबांचा लग्नास विरोध होता. माधुरीचे कुटुंब महेशला सातत्याने धमकावत हाेते. तिच्या वडिलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे महेशही घाबरत होता. त्यामुळे माधुरीच्या आईवडिलांवर संशय येईल असा स्वत:च्या हत्येचा बनाव रचायचा, त्यात त्यांना अटक होऊन आपण कायमचे दूर पळून जाण्याचा कट त्यांनी रचला होता. ३१ ऑक्टोबर रोजी त्याने अमोलला पार्टीसाठी सारंगपूरमध्ये बोलावून दारू पाजून क्रूर हत्या केली. महेशची हत्या भासवण्यासाठी चेहरा सिल्क कापडाने बांधून मृतदेह जाळून टाकला. त्याच्या खिशात महेशचे आधार कार्ड, पॅनकार्ड ठेवून दाेघेही पसार झाले. मात्र, ७२ तासांत त्यांचा कट उघडकीस आला.

Web Title: Plan to trap girlfriend's parents, youth murdered and burn close friend, put his Aadhar card inside cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.