‘नियोजन’कडूून
By Admin | Published: February 19, 2016 12:26 AM2016-02-19T00:26:12+5:302016-02-19T00:37:05+5:30
लातूर : शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने सिग्नल्ससाठी महानगरपालिकेला १ कोटी ५६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लातूर : शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने सिग्नल्ससाठी महानगरपालिकेला १ कोटी ५६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील १३ ठिकाणी सिग्नल्स बसविले जाणार आहेत. सिग्नल उभारणी व देखभाल दुरुस्ती मनपाकडे राहणार असून, वापर वाहतूक शाखेकडून होणार आहे.
लातूर शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सिग्नल्स बसविण्याचा निर्णय झाला. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार नियोजन समितीने शहरातील १३ ठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी १ कोटी ५६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महानगरपालिकेकडे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. सिग्नलसाठी निधी खर्च करण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यानुसार लातूर शहरात १३ ठिकाणी हे सिग्नल्स बसविले जाणार आहेत.
नंदी स्टॉप, विवेकानंद चौक, गांधी चौक, हनुमान चौक, सुभाष चौक, रेणापूर नाका, खर्डेकर स्टॉप, राजस्थान शाळा परिसर, शाहू चौक, बार्शीरोडवरील पाण्याची टाकी, दयानंद कॉर्नर, शिवाजी चौक, गुळ मार्केट या १३ ठिकाणी दीड कोटी रुपये खर्च करून सिग्नल्स बसविले जाणार आहेत. शिवाजी चौक येथील सिग्नलसाठी २० लाख व गुळ मार्केट येथील सिग्नलसाठी १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. उर्वरित ११ ठिकाणी प्रत्येकी १० लाखांचे सिग्नल बसविले जाणार आहेत. या १३ सिग्नल्ससाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार १ कोटी ५६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी कोलगणे यांनी दिली.