नियोजनाचा पूर्णत: फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:38 AM2017-09-26T00:38:56+5:302017-09-26T00:38:56+5:30
कर्णपुरा यात्रेत वरकमाईच्या जत्रेमुळे नियोजनाचा पूर्णत: फज्जा उडाला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्णपुरा यात्रेत वरकमाईच्या जत्रेमुळे नियोजनाचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. छावणी, पालिका, महसूल प्रशासनातील समन्वयाअभावी यात्रेत येणा-या भक्तांना विशेषत: महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पहाटेपासून अनवाणी दर्शनाला जाणाºया भक्तांना देवीच्या मंदिरापर्यंत जाताना खडी असलेल्या रस्त्यावरून जावे लागत आहे. सिमेंटही ओबडधोबड टाकून ठेवल्यामुळे अनेक भक्तांच्या पायांना जखमा होत आहेत. याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न असून नफेखोरीच्या नादात यात्रेच्या ‘स्टॅर्ण्डड आॅपरेटिंग प्रोसेस’ चा कुठेही वापर झालेला दिसत नाही.
जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा येथील यात्रा प्रसिद्ध आहे. १३ ते १५ लाखांदरम्यान भाविक यात्रेनिमित्त येतात. त्यामुळे या यात्रेचे नियोजन महत्त्वाचे असताना यंदा पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
महावीर चौकातील उड्डाणपुलाखालून छावणीची हद्द सुरू होते. सुुरुवातीपासून मंदिरापर्यंत १०० फू ट रस्त्यात ये-जा करण्यासाठी प्रयोजन करण्याऐवजी ५० फूट मार्ग शिल्लक राहिला आहे. रहाटपाळण्यासह इतर दुकाने रस्त्यावर लावण्यात आली आहेत.
३३ लाख ७५ हजारांत पूर्ण यात्रा परिसराचा ठेका छावणी परिषदेने दिला. १ कोटींपेक्षा अधिकची रक्कम ठेकेदारांनी कमविली आहे. यामध्ये पूर्ण यात्रेचा मार्ग विकून टाकल्याने खडी व चिखल असलेल्या मार्गाने भक्तांना यावे लागते आहे. अग्निशमनचे वाहन ये-जा करील एवढी जागादेखील शिल्लक नाही. आपत्कालीन मार्गाची व्यवस्था नाही. छावणीचे सीईओ विजयकुमार बालन नायर यांनी मोफत पार्किंगचे पत्र काढले असले तरी मनपा हद्दीत पार्किंगसाठी रक्कम द्यावीच लागते. मोफत पार्किंगवर लावलेल्या वाहनांची हवा सोडण्याचा प्रकार रविवारी घडला.
महसूल प्रशासनाचे मत असे...
उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले, यात्रेचे पूर्ण व्यवस्थापन छावणीकडे आहे. छावणी परिषदेची यात्रेच्या नियोजनासाठी वेगळी एसओपी आहे.
छावणी परिषदेची जबाबदारी
मंदिर परिसर मोकळा असावा. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाºयांशी समन्वय ठेवून उपाययोजना कराव्यात. भाविकांसाठी दर्शन करण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावेत. मार्गातील अतिक्रमणे काढून टाकावीत. रोज पाहणी करून नियोजन करणे गरजेचे आहे.
पार्किंगमध्ये लूट
परिषदेने पार्किंगसाठी टेंडर काढले. ३५ लाखांपर्यंत आलेले टेंडर प्रशासनाने रद्द केले.
मोफत पार्किंगची सुविधा दिली असली तरी सुरक्षा वा-यावर आहे. दुसरीकडे पंचवटी चौकात २० रुपये दुचाकीसाठी घेऊन पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. हे दर कोणत्या कुणी ठरविले, याचे उत्तर कुणाकडेही नाही.