छोट्या कुटुंबाची ‘प्लॅनिंग’ सासरी, मात्र 'ऑपरेशन'ची जबाबदारी माहेरवरच!

By संतोष हिरेमठ | Published: May 15, 2024 11:54 AM2024-05-15T11:54:29+5:302024-05-15T11:54:53+5:30

जागतिक कुटुंब दिन विशेष: १० पैकी ८ जणींच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी माहेरवरच

'planning' of the small family done at husband's home, but the responsibility of the 'operation' is on the wife's parents! | छोट्या कुटुंबाची ‘प्लॅनिंग’ सासरी, मात्र 'ऑपरेशन'ची जबाबदारी माहेरवरच!

छोट्या कुटुंबाची ‘प्लॅनिंग’ सासरी, मात्र 'ऑपरेशन'ची जबाबदारी माहेरवरच!

छत्रपती संभाजीनगर : ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ असे म्हटले जाते. त्यामुळे एक अथवा दोन अपत्ये झाल्यानंतर ‘फॅमिली प्लॅनिंग’ म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते. मात्र, आजही ही शस्त्रक्रिया करायची म्हटल्यास माहेरीच, अशी स्थिती पाहायला मिळते आहे. १० पैकी ८ जणींच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी माहेरचे लोकच पार पाडत आहेत.

दरवर्षी १५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन पाळला जातो.कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आयुष्यात कोणी कितीही यशस्वी झाला तरी कुटुंबाशिवाय त्याला यशाचा आनंद घेता येत नाही. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धत असे. परंतु, आता विभक्त कुटुंब पद्धत वाढली आहे. पती-पत्नी आणि दोन अपत्ये, अशा कुटुंबांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दोन अपत्ये झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते. काहीजण एक अपत्य झाल्यावरही शस्त्रक्रिया करतात. ही शस्त्रक्रिया करायची तर माहेरीच, असेच समीकरण पाहायला मिळते.

शस्त्रक्रिया माहेरी करण्याची कारणे
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया माहेरी करण्यामागे अनेक कारणे पुढे केली जातात. माहेरी शस्त्रक्रिया केल्याने महिलेची अधिक काळजी घेतली जाते, अधिक आराम मिळतो, नवरा-बायको आणि मुलेच असल्याने शस्त्रक्रिया माहेरी करण्याशिवाय पर्याय नाही, अशी कारणे सांगितली जातात.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची स्थिती
- एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : ४ हजार ५४२
- एप्रिल २०२४- ७५३
- ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयांत मोफत होते.
- खासगी रुग्णालयांत किमान २० ते ३० हजार रुपये खर्च येतो.

महिन्याला ४५ शस्त्रक्रिया
घाटीत महिन्याला कुटुंब नियोजनाच्या जवळपास ४५ शस्त्रक्रिया होतात. या शस्त्रक्रिया मोफत होतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी माहेरी येणाऱ्यांची संख्या अधिक पाहायला मिळते.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

प्राथमिक आरोग्य केंद्रांतही शस्त्रक्रिया
जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होतात. टाक्याची आणि बिनटाक्याची म्हणजे लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया होतात. पहिल्या, दुसऱ्या बाळानंतर लगेच कुटुंब नियोजन केले जात असेल तर ते माहेरी केले जाते. खूप अंतराने शस्त्रक्रिया करताना ती सासरी केली जात असल्याचे पाहायला मिळते.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

Web Title: 'planning' of the small family done at husband's home, but the responsibility of the 'operation' is on the wife's parents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.