अजिंठा लेणी परिसरात वृक्षलागवड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:27+5:302021-06-22T04:05:27+5:30
औरंगाबाद : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात इको बटालियनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करावी. जि.प. माध्यमातून ...
औरंगाबाद : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात इको बटालियनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करावी. जि.प. माध्यमातून राबविण्यात येणारा झकास पठार उपक्रम लेणी परिसरात राबवावा, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
अजिंठा लेणी परिसरात वृक्ष लागवड करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत सत्तार बोलत होते. बैठकीस आ. अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उप वनसंरक्षक अरुण पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.एन. गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, पुरातत्त्व विभागाचे डॉ. किशोर सोलापूरकर, पर्यटन विकास महामंडळाच्या अंजली बडवे, अजिंठा क्षेत्रीय वनाधिकारी एस.पी. मंगदरे आदींची उपस्थिती होती.
तृतीयपंथीयांना कोविड लस प्राधान्याने द्या
औरंगाबाद : कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना कोरोना नियंत्रण लस प्राधान्याने देऊन त्यांना संरक्षित करावे. अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सोमवारी दिल्या. तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली.
जिल्ह्यात २४ ठिकाणी शिवभोजन
औरंगाबाद : जिल्ह्यातील २४ शिवभोजन भोजनालयात गरीब, गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येते. १४ जुलैपर्यंत शिवभोजन थाळी पात्र लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध आहे. गरजूंनी शिवभोजन नि:शुल्क घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
कर्ज प्रस्तावासाठी आवाहन
औरंगाबाद : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य योजना आणि बीज भांडवल योजनांच्या कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० जुलैपर्यंत डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन येथे अर्ज स्वीकारले जातील.