हायटेक महाविद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:02 AM2021-06-19T04:02:17+5:302021-06-19T04:02:17+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे सहसचिव अमन जाधव, प्राचार्य गोविंद ढगे, प्राचार्य संतोष ...
वाळूज महानगर : बजाजनगरातील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे सहसचिव अमन जाधव, प्राचार्य गोविंद ढगे, प्राचार्य संतोष शेळके, प्राचार्य एस.पी. वैद्य, प्रा. ए.एस.आडकिणे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून झाडे जगविण्याचा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी प्रा.आर.एफ. सिद्दीकी, प्रा.पी.एम. मोहिते, प्रा.बी.पी. पिंगळे, प्रा.जे.के. भोरे, प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव आदींची उपस्थिती होती.
--
एएस क्लब रोडवरील पथदिवे सुरू
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातून एएस क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंद पडलेले पथदिवे सिडको प्रशासनाने सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्यात आले आहेत.
----
बजाजनगरात अतिक्रमण वाढले
वाळूज महानगर : बजाजनगरातील मुख्य चौकात विविध छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करत हातगाड्यांवर व्यवसाय थाटले आहेत. याशिवाय काही विक्रेते रस्त्याच्या कडेलाच ठाण मांडून व्यवसाय करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या भागातील जयभवानी चौक, लोकमान्य चौक, मोहटादेवी चौक, आंबेडकर चौक आदी ठिकाणी अतिक्रमण वाढतच चालले आहे. या अतिक्रमणाकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.
----
वाळूज परिसरातील वीजपुरवठा खंडित
वाळूज महानगर : महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाळूज, जोगेश्वरी, रामराई आदी भागातील वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत खंडित करण्यात आला होता. पावसाळ्यापूर्वीच देखभाल व दुरुस्तीचे काम करण्याची आवश्कता असताना महावितरणकडून पावसाळा सुरू झाल्यानंतर दुरुस्तीची कामे केली जात असल्याने वीजग्राहक व व्यावसायिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
-----
महाराणा प्रताप चौकात अवैध वाहनतळ
वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकालगत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कार, जीपचालकांनी खुल्या भूखंडावर अवैध वाहनतळ उभारले आहे. महाराणा प्रताप चौकात औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या या रस्त्यावर दिवसभर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप व कार उभ्या करण्यात येतात. या वाहनामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, हे अवैध वाहनतळ हटविण्याची मागणी कामगार व नागरिकांतून होत आहे.
-----------------------------