लावला कापूस अन् विमा उतरवला मोसंबी, डाळिंबाचा; तब्बल ४ हजार शेतकऱ्यांचा कारनामा उघड
By बापू सोळुंके | Published: October 31, 2024 06:42 PM2024-10-31T18:42:13+5:302024-10-31T18:44:22+5:30
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली.
छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना फळ पीकविमा काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरचा शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याचे समोर आले. यानंतर कृषी विभागाने नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबविली. यात कपाशी लावलेल्या शेताला शेतकऱ्यांनी मोसंबी, डाळिंबाची बाग दाखवून विमा उतरविल्याचे आढळून आले. अशा प्रकारे बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ४ हजार २३ आहे.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. तर डाळिंब, चिकू, पेरूच्या बागाही शेतकऱ्यांनी जोपासल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी १३ हजार २८३ शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा उतरविल्याची माहिती विमा कंपनीकडून कृषी विभागाला प्राप्त झाली होती. कृषी विभागाकडे असलेल्या नोंदीपेक्षा ८०५ हेक्टर क्षेत्र अधिक असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ हजार २८३ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन २० ते २८ ऑक्टोबर दरम्यान फळबागांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. तेव्हा शेतकऱ्यांनी मोसंबीची बाग असल्याचे दाखवून ज्या क्षेत्राचा विमा उतरविला, त्या शेतात कापसाचे पीक असल्याचे दिसून आले. तर एका शेतकऱ्याने चक्क जनावरांसाठी टाकलेल्या गजराज गवताच्या जमिनीवर डाळिंबाची बाग दाखवित विमा काढल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शिवाय अन्य शेतकऱ्यांनीही अशीच बोगसगिरी करीत फळबाग लावली नसताना पीक विमा काढल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले. अशा एकूण ४ हजार २३ शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.
अडीच हजार शेतकऱ्यांनी काढला जादा क्षेत्राचा विमा
जिल्ह्यातील २ हजार ५२५ शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. मात्र त्यांनी विमा उतरविताना त्यांच्याकडे असलेल्या फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर बाग असल्याचे दाखवले आहे.
दोन तालुक्यात बोगसगिरी अधिक
फळबाग नसताना शेतात बाग असल्याचे कागदोपत्री दाखवून विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक ८८३ शेतकरी पैठण तालुक्यातील आहेत. तर ५५२ शेतकरी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आहेत.