प्लास्टिक बंदीने औरंगाबाद जिल्ह्यातील ४० उद्योग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:44 AM2018-07-13T00:44:33+5:302018-07-13T00:47:16+5:30
प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणारे छोटे-मोठे ४० उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी ३ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शिवाय ७० कोटींची उलाढाल थांबली आहे.
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणारे छोटे-मोठे ४० उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी ३ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शिवाय ७० कोटींची उलाढाल थांबली आहे.
२०० मिलीपर्यंतच्या बाटलीबंद पाणी विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे २०० ऐवजी २५०, ३०० आणि ५०० मिलीपर्यंतच्या बाटल्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. यामध्ये प्लास्टिक कप, थर्माकोल व प्लास्टिकचे ताट, ग्लास, कप, प्लेट, ग्लास, वाटी, चमचा, स्ट्रॉ, कॅरिबॅगवर बंदी लावण्यात आली. यामुळे या साहित्याची उत्पादने घेणाऱ्या जिल्ह्यातील उद्योगांवर संकट कोसळले.
जिल्ह्यातील ४० उद्योगांतील उत्पादन सध्या बंद आहे. प्लास्टिक कप, ग्लास यासह शॉपिंग बॅगची जाडी वाढवून उत्पादनास परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. आज ना उद्या ही परवानगी मिळेल, या अपेक्षेने प्रत्येक जण वाट पाहत आहे. त्यामुळे अजूनही कामगार पूर्ण काढण्यात आलेले नाहीत. आगामी काही दिवसांत अनुकूल निर्णय झाला नाही तर हे उद्योग कायमस्वरुपी
बंद होतील. परिणामी ३ हजार कामगार उघड्यावर येण्याची भीती आहे.
जिल्ह्यात १० ते १२ उद्योग बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात आहेत. त्यातून सुमारे वार्षिक १० क ोटींच्या आसपास उलाढाल होते. २०० मिलीच्या बाटलीबंद पाणी विक्र ीवर बंधने आली. यामुळे झाक ण, स्लीव्हस्,पॅके जिंग, लेबल्स प्रिंटिंग या उद्योगांवर परिणाम झाला. परंतु यासंदर्भातील उद्योगांनी आता मोठ्या आकाराच्या बाटल्यांच्या उत्पादनांवर भर दिला आहे. त्यामुळे बाटली उद्योगावर फार परिणाम झाला नाही. कायमस्वरुपी बंद होण्याची वेळ आलेल्या प्लास्टिक उद्योगांच्या मालकांसह कामगार अडचणीत सापडल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. २०० मिलीच्या पाणी बाटलीसह पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅगचा साठा उत्पादक-विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांकडेही पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाणी पाऊचवरदेखील बंदी आली आहे. यासंदर्भात काहींनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे, अशी माहितीही उद्योजकांनी दिली. आजघडीला कारवाईच्या भीतीपोटी रेल्वेस्टेशन, बसस्थानक, हॉटेल याठिकाणी पाणी पाऊच दिसत नाहीत.
मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कॅरिबॅग बंदीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु मराठवाड्यातील उद्योग बंद होऊ नये,यासाठी पर्यावरणपूरक अशा पद्धतीने पाणी ग्लास, ६० जीएसएम बॅग यांसह अन्य साहित्यांची जाडी वाढवून उत्पादनाची परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्र्यांकडे केली आहे. आजघडीला जिल्ह्यातील ४० उद्योगांचे उत्पादन बंद पडले आहे. त्यामुळे महिन्याकाठी ७० कोटींची उलाढालही थांबली आहे. आज ना उद्या काही निर्णय होईल,याकडे उद्योग मालक आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.
-प्रवीण काला, सचिव, मराठवाडा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
उत्पादन घेणाºयांवर कारवाई
२०० मिलीपर्यंतच्या पाणी बाटलीवर बंदी आहे. शिवाय २०० मिलीपर्यंतच्या द्रवपदार्थाच्या पाऊचवरही बंदी आहे. जिल्ह्यात उद्योगांचे मंडळाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. बंदी असलेल्या उत्पादनाच्या वापरासंदर्भात महापालिकेने कारवाई केली पाहिजे, तर त्यांचे उत्पादन सुरूअसेल तर त्यावर आमच्याकडून कारवाई केली जाईल. आतापर्यंत एका कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.
- ज. अ. कदम, उपप्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ