मसापचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:10 AM2017-09-07T01:10:19+5:302017-09-07T01:10:19+5:30
यंदा २९ सप्टेंबरला मराठवाडा साहित्य परिषद ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : २९ सप्टेंबर १९४३ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना झाली. यंदा २९ सप्टेंबरला मराठवाडा साहित्य परिषद ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त वर्धापन दिनाचा कार्यक्रम उस्मानाबाद येथे घेण्यात येत आहे.
यानिमित्त वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातील, अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह दादा गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमातच हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक संतराम शहापुरे आणि तुकाराम ढवळे यांचाही परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. ख्यातनाम साहित्यिक डॉ. गो.मा. पवार यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असेल. तसेच हिंदी-मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. वेदकुमार वेदालंकार यांचीही याप्रसंगी विशेष उपस्थिती असेल. साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला उस्मानाबाद नगर परिषदेने दहा हजार चौरसफूट जागा दिली असून, या जागेवर लवकरच संत गोरोबा काका सभागृह उभारले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन होईल. याप्रसंगी मधुकरराव मुळे यांना परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच दि.२४ व २५ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी असतील. यादरम्यान मराठी शिक्षकांसाठी शाखा संमेलनही होणार आहे.
हिंदीतील युगप्रवर्तक साहित्यिक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि.८ आॅक्टोबर रोजी मराठवाडा साहित्य परिषदेत हा कार्यक्रम होईल. हिंदी व मराठी भाषेचे जाणकार विष्णू खरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होईल. याशिवाय विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्याचे पुनर्वाचन कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.