‘खेलो इंडिया’त औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धी चमकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:04 AM2018-02-15T01:04:50+5:302018-02-15T01:05:11+5:30
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकर हिने अन्इव्हन बार या क्रीडा प्रकारात रौप्य, तर रिद्धी हत्तेकर हिने सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टपटू म्हणून चौथे मानांकन मिळवून आपला विशेष ठसा उमटवला. १७ वर्षांखालील गटात मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
औरंगाबाद : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकर हिने अन्इव्हन बार या क्रीडा प्रकारात रौप्य, तर रिद्धी हत्तेकर हिने सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टपटू म्हणून चौथे मानांकन मिळवून आपला विशेष ठसा उमटवला.
१७ वर्षांखालील गटात मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. औरंगाबादच्या हत्तेकर भगिनींच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष लागून होते. पहिल्या दिवशी झालेल्या सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्ट स्पर्धेत पूर्वा किरवे (ठाणे) हिने ४०.८५ गुण मिळवत कास्यपदक पटकावले, तर रिद्धी हत्तेकर हिने आपल्या पाठीच्या दुखण्यातून सावरत ३८.५५ गुणांची कमाई करीत चौथे स्थान प्राप्त केले, तसेच सिद्धी हत्तेकर हिने ३८.०५ गुण मिळवत पाचवे स्थान प्राप्त केले.
त्यानंतर साधन अंतिम स्पर्धा प्रकारात सिद्धीने अनइव्हन बारवर नेत्रदीपक कामगिरी करीत ८.४० गुण घेत रौप्यपदक पटकावले, तर महाराष्ट्राच्या पूर्वा किरवेने ८.६५ गुण घेत सुवर्णपदक पटकावले. रिद्धी हत्तेकरने बॅलन्सिंग बीम या साधन प्रकारावर अचूक संच केला; मात्र काठिण्य पातळी कमी पडल्यामुळे तिला चौथ्या स्थानावर (१०.७० गुण) समाधान मानावे लागले.
रिद्धी व सिद्धी या भगिनी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या आठवीतील विद्यार्थिनी असून, औरंगाबादच्या साई पश्चिम विभाग केंद्रात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर क्रीडा प्रशिक्षक तनुजा गाढवे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे.
या यशाबद्दल ‘साई’चे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, मुख्य प्रशिक्षक अजितसिंग राठोड, सहायक प्रशिक्षक पिंकी देब, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मकरंद जोशी, औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे, सचिव प्रा. सागर कुलकर्णी, साईचे संतोष कुन्नापुडा, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा देव, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे, क्रीडा शिक्षिका जगताप आदींनी या भगिनींचे अभिनंदन केले आहे.