‘खेलो इंडिया’मधून आॅलिम्पिक खेळाडू घडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:52 AM2018-05-15T00:52:14+5:302018-05-15T00:54:33+5:30
क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
जयंत कुलकर्णी ।
औरंगाबाद : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले की, ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी विविध खेळांतील प्रतिभावान अशा एक हजार खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंवर त्यांचा आहार, निवास, प्रशिक्षण, शिक्षण, स्पर्धा आदींसाठी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि खेळाडूंना दत्तक घेण्याची ही प्रक्रिया आठ वर्षे सुरू राहणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना २0२४ व २0२८ च्या आॅलिम्पिकसाठी घडवले जाईल. या उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरातील खेळाडूंवर सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही, तसेच एक प्रतिभावान खेळाडूंचा चमू मिळणार आहे. याचा फायदा भारताला आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी होईल. तसेच दीपिका, अतानुदास यांच्यासारखे अनेक खेळाडू देशाला आॅलिम्पिकसाठी मिळतील आणि पदक जिंकण्याची संधीदेखील वाढेल.’
खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची गरज : पौर्णिमा माहातो
भारतात गुणवत्ता भरपूर आहे; परंतु आॅलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर भारतीय खेळाडूंना आत्मविश्वासाच्या अभावामुळे पदक जिंकण्यात अपयश मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पौर्णिमा माहातो यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय तिरंदाजी शिबिराच्या निमित्ताने त्या येथे आल्या होत्या. खेलो इंडियांतर्गत तिरंदाजी शिबीर हे २०२४ व २०२८ आॅलिम्पिक लक्षात घेऊन आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत खेळाडूंना सुविधा मिळत आहेत. तिरंदाजीत कोरियाकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. त्यानंतर कोरिया, तैपई यांचा क्रमांक लागतो. भारत चौथ्या ते पाचव्या स्थानावर आहे. कामगिरी उंचावण्यासाठी भारतीय संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे. जागतिक, आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी एक महिना एकत्रित नियोजन बद्ध सराव करण्याची आवश्यकता आहे. तसेच आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची नितांत गरज असल्याचे पौर्णिमा माहातो यांनी सांगितले. पौर्णिमा माहातो यांना २०१३ साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्या भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षिकादेखील आहेत.