नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणीच नाही
By विजय सरवदे | Published: October 19, 2023 12:05 PM2023-10-19T12:05:08+5:302023-10-19T12:05:27+5:30
तपासणी मोहीमेत जिल्हा आरोग्य विभागाने बजावल्या नोटीस
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अनेक जण अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत काही जणांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नोंदणी (रजिस्ट्रेशन) नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा डॉक्टरांना नोटीस देण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून हे डॉक्टर बोगस आहेत का नाहीत, याची तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
या मोहिमेत ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या काही डॉक्टरांसंदर्भात ग्रामपंचायत, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागविण्यात आले. त्यात अनेकांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे दिसून आले. आता या डॉक्टरांच्या पदवीबाबत तपासणी करून जर ते बोगस आढळून आले, तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.
जिल्ह्यातील ६९२ अंगणवाड्यांतील १८ हजार ७६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५३६ बालके अतिगंभीर, गंभीर कुपोषित श्रेणीमध्ये निष्पन्न झाली असून त्यांना योग्य तो आहार देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. दलित वस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार केला आहे. ३० कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून तरतूद आहे. याअंतर्गत शासननिर्देशानुसार विकासाची कामे केली जातील. समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग संवर्गातील लाभार्थ्यांना ऑक्टोबर अखेर साहित्य वाटप केले जाईल. जिल्ह्यातील २५४ जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्याबाबत पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली जाईल, असे मीना यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्रशासन सज्ज
पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून मागणीनुसार पाण्याचे टँकरही सुरू करण्यात आले आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करून जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असेही ‘सीईओ’ विकास मीना यांनी सांगितले.