सुखद ! बीबी का मकबरा पुन्हा हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 02:40 PM2020-12-21T14:40:27+5:302020-12-21T14:41:28+5:30

पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीनेच खरेदी करावी लागली तिकिटे

Pleasant! Bibi-Ka-Makbara again housefull | सुखद ! बीबी का मकबरा पुन्हा हाऊसफुल

सुखद ! बीबी का मकबरा पुन्हा हाऊसफुल

googlenewsNext
ठळक मुद्देतांत्रिक अडचणी आल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने तिकीट विक्री होऊ शकली नाही

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि परिसरातील ऐतिहासिक स्मारके आणि पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाल्यानंतरच्या दुसऱ्या रविवारीही बीबी का मकबरा आणि वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होती.

देशभरातील पर्यटन स्थळांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच तिकीट विक्री होत आहे. मात्र, तिकीट खरेदी करताना वेबसाइट हँग होणे, क्यूआर कोड स्कॅन न होणे, तिकीट डाऊनलोड न होणे अशा अनेक अडचणी पर्यटकांना येत होत्या. त्यामुळे अनेक पर्यटकांना तिकीट मिळाले नाही व त्यांना पर्यटन स्थळे न पाहताच परतावे लागले. याविषयीचे वृत्त लोकमतने गत आठवड्यातच प्रकाशित केले होते. केवळ औरंगाबाद शहरातच नव्हे तर देशभरात पर्यटकांना या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे रविवारपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने तिकीट विक्री सुरू होईल, असे पुरातत्त्व खात्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार रविवारी ऑफलाइन तिकीट विक्री होणे अपेक्षित होते. मात्र, पुन्हा काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने तिकीट विक्री होऊ शकली नाही आणि पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीनेच तिकिटे खरेदी करावी लागली.

मकबरा परिसरात पर्यटकांना मार्गदर्शन
मागील रविवारी बीबी का मकबरा येथे आलेल्या पर्यटकांना ऑनलाइन तिकीट काढताना अनेक अडचणी आल्या. मात्र, पर्यटकांच्या अडचणी सोडवून तिकीट कसे काढावे, हे सांगण्यासाठी तेथे कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. रविवारी मकबरा प्रशासनाचे कर्मचारी ठिकठिकाणी उभे राहून पर्यटकांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे मागील रविवारच्या तुलनेत यावेळी पर्यटकांना कमी त्रास सहन करावा लागला.

पर्यटकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल
रविवारी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने तिकीट काढण्याचा प्रयत्न वेरूळ लेणी आणि बीबी का मकबरा परिसरात करण्यात आला. मात्र, दिल्ली येथील सेंट्रल पद्धतीमध्येच काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही पद्धत रविवारी इतर पर्यटन स्थळांमध्ये सुरळीत होऊ शकली नाही. त्यामुळे पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीनेच तिकीट घ्यावे लागले. तिकीट स्कॅनिंग आणि प्रिंटिंगमध्येही अडचणी आल्या. मात्र, याचा पर्यटकांना त्रास होणार नाही, याची योग्य काळजी पर्यटन स्थळांवर घेण्यात आली.
- मिलनकुमार चावले, सुपरिंटेंडिंग आर्किओलॉजिस्ट

Web Title: Pleasant! Bibi-Ka-Makbara again housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.