सुखद ! कोरोनाच्या नरकासुराला डॉक्टरांनी आणले जेरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 01:17 PM2020-11-03T13:17:07+5:302020-11-03T13:19:59+5:30
रुग्णांची संख्या कमी झाली आणि ऑक्सिजनची मागणीही घटली.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा विळखा सैल झाला आहे. कोरोना रुग्णांची, त्यातही गंभीर, अतिगंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.
जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मे महिन्यापासून रोज लक्षणे नसलेल्या आणि गंभीर रुग्णांची भर पडत गेली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली होती. ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरून गेले होते. तर आयसीयू बेड, व्हेंटिलेटरसाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ कोरोनाच्या रुग्णांवर ओढावली होती. या सगळ्यामुळे ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती; परंतु आता रुग्णांची संख्या कमी झाली आणि ऑक्सिजनची मागणीही घटली.
एकट्या घाटीत सध्या ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांखाली आली आहे. जिल्ह्यात गेल्या ७ महिन्यांत अनेक सण, उत्सव कोरोनाच्या सावटाखालीच गेले. त्यामुळे सणांचा उत्साह पहायला मिळाला नाही; परंतु गेल्या महिनाभरात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे सणाची लगबग सध्या सुरू आहे.
जिल्ह्याला विविध ठिकाणांहून ऑक्सिजनचा होतो पुरवठा
चाकण-पुणे, रायगड, ठाणे यासह औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पुरवठादारांकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी ऑक्सीजनचा पुरवठा केला जातो. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी कमी आहे; परंतु खबरदारी म्हणून रुग्णालये ऑक्सिजन साठा ठेवण्यावर भर देत आहेत. रोज साधारण ८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. सध्या रुग्णालयाकडेही ऑक्सीजनचा भरपूर साठा उपलब्ध आहे. पुरवठ्यात काहीही अडचण नाही, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.