सुखद ! औरंगाबादहून आता दररोज सकाळी मुंबईसाठी ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 07:17 PM2021-01-02T19:17:59+5:302021-01-02T19:19:44+5:30
Aurangabad Airport : किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.
औरंगाबाद : इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ८ जानेवारीपासून दुपारऐवजी आता सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे मुंबईला लवकर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.
इंडिगोने काही दिवसांपूर्वीच प्रवाशांची मागणी पाहून मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस आहे. मात्र, ८ जानेवारीपासून हे विमान दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईसाठी शहरातून रोज हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहणार आहे. हे विमान सध्या मुंबईहून येऊन औरंगाबादहून दुपारी १२.१० मुंबईला रवाना होते. मुंबईत पोहोचेपर्यंत एक वाजून जातो. त्यामुळे अर्धा दिवस औरंगाबादेत आणि अर्धा दिवस मुंबईत अशी प्रवाशांची अवस्था होती. त्यातून नियोजित कामे करण्यास अनेक अडचणी येतात.
त्यामुळे मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानाचे उड्डाण झाले पाहिजे, अशी मागणी होत होती. त्यासाठी इंडिगोकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता औरंगाबादहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेईल,अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. आठवड्यातून ३ दिवसांसाठी एअर इंडियाचीही मुंबईसाठी विमानसेवा सुरु आहे. त्यामुळे किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.