सुखद! जायकवाडी धरणात १८१५ क्युसेक क्षमतेने आवक; पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहचला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:36 PM2022-06-29T19:36:47+5:302022-06-29T19:36:58+5:30
मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने १ जूनपासून धरणात दीड टीएमसी पाणी दाखल
पैठण (औरंगाबाद): जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात आवक सुरु झाली आहे. १८१५ क्युसेक्स क्षमतेने बुधवारी धरणात पाणी दाखल होत होते. १ जून पासून जलाशयात जवळपास दीड टीएमसीची भर पडली असून धरणाचा जलसाठा ३४ % ईतका झाला असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असून आजच्या तारखेला गतवर्षी १४८ मि.मी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा फक्त ९३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पैठण, गंगापूर, नेवासा, शेवगाव आदी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचे पाणी धरणात दाखल होत आहे.
दरम्यान, १ जून पासून धरणात ४३.४३ दलघमी ( दिड टिएमसी) ऐवढे पाणी दाखल झाले आहे. बुधवारी सायंकाळी धरणात ३३.९४% (७३६.७३७ दलघमी) ऐवढा जलसाठा होता. गतवर्षी २९ जूनला ३३% जलसाठा धरणात होता, असे अभियंता काकडे यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्याने जायकवाडी धरणावरील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आला असून धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या भागातील पावसाच्या नोंदी व तत्सम कामे धरण नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहेत.