सुखद ! मुंबईनंतर औरंगाबादेत महापालिकेच्या सीबीएसई शाळा; आठच दिवसात प्रवेश फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 12:23 PM2021-08-10T12:23:34+5:302021-08-10T12:34:33+5:30
Admission to Aurangabad Municipal Corporation's CBSE schools is full :१५ ऑगस्टला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन उद्घाटन
औरंगाबाद : शहरातील गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा (CBSE School ) सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला आहे. उस्मानपुरा आणि गारखेडा येेथील शाळेत सीबीएसईच्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. या शाळांचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांच्या हस्ते होणार आहे. ( Municipal CBSE schools in Aurangabad after Mumbai; Admission full in eight days)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या शाळा सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सीबीएसईच्या मान्यतेने सुरू केल्या जाणार आहेत. तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध असून, सीबीएसईचे वर्ग सुरू करताच पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी गर्दी केली. आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे.
हेही वाचा - हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?
प्रत्येक वर्गात २० मुलांना प्रवेश
जुलैअखेरीस दोन्ही शाळांमध्ये सीबीएसईचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रत्येक वर्गात ५० मुलांची प्रतीक्षा यादी आहे. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.
कोण शिकविणार विद्यार्थ्यांना
पालिकेतील शिक्षकांमधूनच २५ ते ३० शिक्षक सीबीएसईचे वर्ग घेण्यासाठी निवडण्यात आले आहेत. हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या दोन्ही शाळांत सीबीएसई वर्ग योग्य प्रकारे चालविण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.
सीबीएसई शाळांचे १५ ऑगस्टला उद्घाटन
मुंबई महापालिकेनंतर राज्यात औरंगाबाद महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उस्मानपुरा आणि गारखेडा येथील शाळांमध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रवेश फुल्ल झाले आहेत. या शाळांचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.