सुखद! पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा लवकरच सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 04:40 PM2022-02-15T16:40:27+5:302022-02-15T16:42:15+5:30
शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी
औरंगाबाद : राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने निवेदनाद्वारे केलेल्या सूचनांबाबत सकारात्मक विचार करून अंमलबजावणी होईल. राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर शिष्टमंडळाशी बोलताना म्हणाले.
राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी दीपक कपूर यांच्यासमवेत बैठकीत चर्चा केली. विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे, यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिव्हिल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग करेल, असे ललित गांधी म्हणाले.
ललित गांधी यांनी शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. औरंगाबादहून नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमानसेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरू करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे इ. मागण्यांचा अभ्यास अहवाल सादर केला. राज्यातील जिल्ह्यांना शहराबरोबर जोडण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करावी, असे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी म्हणाले. चेंबरच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या इंधनाच्या मूल्यवर्धित करामध्ये कपात करून तो १ टक्के करावा, असे सुचविले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.
बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्दे :
- रत्नागिरी, कोल्हापूर विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकारकडून मंजूर होणार
- शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार
- अमरावती विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर. पहिल्या टप्प्यातले ६.५ कोटी प्राप्त
- अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार
- नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करणार
- पुणे -शिर्डी- नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारीपासून अलाइन्स एअर सुरू करणार.
- पुणे - औरंगाबाद- नागपूर सेवा १ मार्चपासून