प्लीज...अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा हो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:48 PM2019-05-20T16:48:03+5:302019-05-20T16:48:03+5:30
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे शहरवासीयांना कळकळीचे आवाहन
औरंगाबाद : अपघात झाल्यानंतर जर त्यादिवशी आमच्या नातेवाईकांना वेळीच मदत मिळाली असती, तर ते आज आमच्यासोबत असते. आपल्या डोळ्यांसमोर जर अपघात झाला, तर बघ्याची भूमिका न घेता प्लीज अपघातग्रस्तांना मदत करा, असे कळकळीचे आवाहन राकेश कवडे आणि स्वप्नील देशमुख यांनी केले. नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या सुमित कवडे व डॉ. अतुल देशमुख यांचे ते नातलग आहेत.
अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपतर्फे रविवारी सायंकाळी झाशी राणी उद्यान येथे श्रद्धांजली आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दौलताबाद रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत पावलेल्या सुमित कवडे आणि टी.व्ही. सेंटर येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉ. अतुल देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि डोळ्यांसमोर अपघात घडलेला असताना सामान्य माणसांनी काय करावे, याविषयी जनजागृती करण्यात आली.
आपल्या मागील बाजूने रुग्णवाहिका येत आहे, हे समजल्यावर चालकांनी ताबडतोब वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्यावे व उजव्या बाजूने जाऊ द्यावे, अशा शब्दांत माजी सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलिसांच्या प्रश्नोत्तरांना सामोरे जावे लागेल, हा जनसामान्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
मिलिंद लिहिणार, आदिनाथ जंगले या अपघातग्रस्तांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तसेच रुग्णवाहिकाचालक अंबादास बाहुले यांनीही उपस्थितांशी संवाद साधून रुग्णवाहिका चालवत असताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे विशद केले.पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही यावेळी भेट दिली. आ. अतुल सावे, अनिल पैठणकर, नगरसेविका कीर्ती शिंदे, आनंद तंदुळवाडीकर, सुधीर नाईक, शिरीष बोराळकर, संजय शिरसाठ यांची यावेळी उपस्थिती होती.
व्हॉटसअॅपचे माध्यम
अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे औरंगाबादचे समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी ग्रुपच्या स्थापनेविषयी महिती दिली. पुणे येथे प्रशांत कनोजिया यांनी स्थापन केलेल्या ग्रुपची प्रेरणा घेऊन २८ मे २०१८ रोजी त्यांनी औरंगाबादेत ग्रुपची सुरुवात केली. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून सुरू झालेल्या या ग्रुपचे कार्य आज विस्तारले असून, अनेक लोक जोडले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले. पुणे येथील अॅम्बुलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे सदस्य रोहित बोरकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.