पाण्याअभावी छत्रपती संभाजीनगरवासीयांचे हाल; चूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नव्हे, मनपाचीच
By मुजीब देवणीकर | Published: February 19, 2024 04:41 PM2024-02-19T16:41:41+5:302024-02-19T16:42:18+5:30
नवीन जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनमुळे हा सर्व प्रकार झालेला नाही.
छत्रपती संभाजीनगर : चार दिवस पाण्याअभावी शहरवासीयांचे हाल झाले. नवीन जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनमुळे हा सर्व प्रकार झालेला नाही. महापालिकेने जुन्या जलवाहिनीवर आम्हाला न विचारता डीपीसी (ड्युल प्लेट चेक) व्हाॅल्व्ह बसविला. त्यामुळे जुनी जलवाहिनी प्रेशर सहन करू शकली नाही. वारंवार ती फुटू लागली. आता आम्ही डीपीसी व्हॉल्व्ह काढण्याची सूचना मनपाला केली. व्हॉल्व्ह काढल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, असा दावा मजीप्रा (महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा)चे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना केला.
प्रश्न - महापालिका म्हणते चूक आमची नाही, तूम्ही म्हणता, चूक त्यांची; नेमका प्रकार काय?
उत्तर- महापालिका अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून बुधवारी दहा तासांचा शटडाऊन घेतला. नियोजित वेळेत क्रॉस कनेक्शनचे काम केले. याच वेळेत मनपाने संग्रामनगर, जायकवाडीत दुरुस्तीची कामे घेतली. फारोळा येथे जुन्या मोठ्या जलवाहिनीवर डीपीसी व्हॉल्व्ह बसविला. मुळात तो बसवायलाच नको होता. जलवाहिनी रिकामी करण्यासाठी म्हणून व्हॉल्व्ह बसविला. त्यामुळे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी प्रेशर सहन करत नव्हती. एकाच बाजूला हा व्हॉल्व्ह उघडत होता. तांत्रिकदृष्ट्या ही पद्धतच चुकीची होती.
प्रश्न- चार दिवसांत तीनवेळा जलवाहिनी फुटण्याचे कारण काय असेल?
उत्तर- क्रॉस कनेक्शनमुळे मोठ्या जलवाहिनीचे प्रेशर उलट कमी झाले. हे कोणालाही कळेल. आम्ही ९०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीची तपासणी ढोरकीनपर्यंत योग्यरीत्या केली. क्लोरिनचे पाणी २४ तास वाहून नेत असल्याने जलवाहिनीची झीज झाली. अनेक ठिकाणी ती विरळ झाली. किंचितही बॅक प्रेशर आला तर ती फुटू लागली. मनपाने केलेले ताजे वेल्डिंग निखळले. कारण ते योग्यरीत्या केलेले नव्हते. मजीप्राला दोष देणे चुकीचे आहे.
प्रश्न- नवीन जलवाहिनीवरील व्हॉल्व्हला तडे जाण्याची कारणे कोणती?
उत्तर- शुक्रवारी सकाळी चितेगाव येथे १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. फारोळा ते जायकवाडीपर्यंतचे पंप बंद करण्यात आले. याच दरम्यान नवीन जलवाहिनीवर बसविलेला व्हॉल्व्हला तडे गेले. हा व्हॉल्व्ह काढून तपासणीसाठी पाठविला आहे. त्यात दोष असेल तर कंपनीवर कारवाई केली जाईल.
प्रश्न- डीपीसी व्हॉल्व्ह काढा, अशी सूचना कोणी केली?
उत्तर- अत्यंत जुन्या जीर्ण जलवाहिनीवर डीपीसी व्हॉल्व्ह बसविलाच जात नाही. आम्हाला सुद्धा याचे आश्चर्य वाटले. शहराला चार दिवस पाणी मिळत नसल्याने आम्हीच मनपाला तो व्हॉल्व्ह काढून घ्या, अशी सूचना केली. त्यांनी व्हॉल्व्ह काढून घेतला. त्यानंतर रविवारी पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.
प्रश्न- तुमची नवीन जलवाहिनी कधी सुरू होणार, शहराला अधिक पाणी केव्हा मिळेल?
उत्तर- किर्लोस्कर कंपनीकडून ४ हजार अश्वशक्तीचे पंप बनवून येत आहेत. दोन ते तीन दिवसांत ते येतील. आल्यावर पंप बसवून आम्ही स्वतंत्रपणे टेस्टिंग करणार आहोत. १५ दिवसांत नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू होईल. शहराला ७५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल.