खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या संपामुळे पशुपालकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:05 AM2021-07-27T04:05:36+5:302021-07-27T04:05:36+5:30
केऱ्हाळा : मागील पंधरा दिवसांपासून खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यात शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयांची असलेली तोकडी सेवा यामुळे ...
केऱ्हाळा : मागील पंधरा दिवसांपासून खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यात शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयांची असलेली तोकडी सेवा यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांचे मोठे हाल होत आहेत. यात अनेक जनावरांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खासगी पशुवैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांचा विविध मागण्यांसाठी १३ जुलैपासून संप सुरू आहे. शासकीय पशुवैद्यकांची सेवा अपुरी असल्याने ग्रामीण भागात सहसा खासगी पशुवैद्यकांचीच सेवा घेतली जाते. मात्र, त्यांचा संप सुरू असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
२३ जुलै रोजी दुपारी सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील रहिवासी इनुसखाँ हबीबखाँ पठाण या शेतकऱ्याच्या बैलाला सर्पदंश झाला होता. त्यांनी परिसरातील सर्व खासगी पशुवैद्यकांना फोन केला. मात्र, संपामुळे सर्वांनी उपचार करण्यास नकार दिल्याने चार तास तडफडून बैल दगावला. यात या शेतकऱ्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागविणारे तालुक्यातील पळशी येथील शेतकरी अंबादास भगवान पुंगळे या शेतकऱ्याची दररोज पंधरा लिटर दूध देणाऱ्या गायीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचाही मृत्यू झाला.
केऱ्हाळा येथील शेतकरी सोमीनाथ रामराव भिंगारे या शेतकऱ्याने कोरडवाहू शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून काही दिवसांपूर्वीच पाच लाख रुपये कर्ज काढून दुग्धव्यवसाय सुरू केला. त्यांच्या गायीची प्रथमच प्रसूती होणार होती. तीन दिवसांपासून गाय आजारी असल्याने त्यांनी अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र, कोणी आले नाही. सरकारी डॉक्टरांचा तर फोनच लागला नाही. शेवटी रविवारी त्यांना स्वत:च गायीची प्रसूती करावी लागली. यात गायीचे नवजात वासरू दगावले. गायही आजारी असून उपचाराविना ती तशीच पडून आहे. यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
उपचार केले तर १५ हजार रुपयांचा दंड
खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर १३ जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संपाची तीव्रता वाढविण्यासाठी त्यांच्या संघटनेने संपकाळात कोणीही जनावरांवर उपचार करायचे नाही, असे ठरविले आहे. ज्याने कोणी हा नियम मोडला. त्याला पंधरा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या भीतीपोटी खासगी पशुवैद्यक कितीही ओळखीचे असले तरी आम्ही येऊ शकत नाही, जर आम्ही उपचार केले, तर संघटना आम्हाला पंधरा हजार रुपये दंड करेल, असे सांगतात. यामुळे पशुपालकांचे हाल होत आहेत. त्यात पशुपालकांच्या जनावरांवर उपचार करण्यास नकार देत आहेत. त्यात सरकारी पशुवैद्यकांचा मोबाइल या काळात बंद येत असल्याने पशुपालक संताप व्यक्त करीत आहेत.