व्हॉट्सअॅप ग्रुपवरील कमेंटवरून 15 ते 20 जणांकडून एकाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 11:39 PM2018-10-14T23:39:34+5:302018-10-15T08:26:19+5:30
वॉट्सअप या सोशल मीडियावर विरोधात मेसेज टाकल्यावरून एका प्लॉटिंग एजंटवर 15 ते 20 जणांनी तलवार, चाकू, रॉड आणि लाठीने हल्ला करून त्यांची भर चौकात निर्घृण हत्या केली.
औरंगाबाद : वॉट्सअप या सोशल मीडियावर विरोधात मेसेज टाकल्यावरून एका प्लॉटिंग एजंटवर 15 ते 20 जणांनी तलवार, चाकू, रॉड आणि लाठीने हल्ला करून त्यांची भर चौकात निर्घृण हत्या केली. यात मृताचा भाचा गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास हर्सूल येथील फातेमानगर चौकात घडली. घटनेनंतर फातेमानगर आणि घाटी रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
मोईन महेमूद पठाण(वय ३५,रा. फातेमानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मोईनचा भाचा इरफान शेख रहीम शेख (वय २४, रा. बेरीबाग, हर्सूल) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्सूल पोलिसांनी सांगितले की, मोईन पठाण हे हर्सूल येथे प्लॉटींग, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात एजंट म्हणून काम करायचे. गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शेखलाल रसूल पटेल, रफीक रसूल पटेल, शोएब सलीम पटेल आणि इतर काही लोकांचा त्यांना विरोध होता.
चार दिवसांपूर्वी मोईन यांनी एका वॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही जणांची कुत्रे अशी संभावना केली होती. हा मेसेज वाचून मारेकऱ्यांपैकी काही जणांनी त्यांना दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक असे धमकावले होते. योग्य वेळी कुत्र्यांची नावेही जाहीर करेन आणि त्यांच्यासमोरही येईन, असे उत्तर दिले होते. त्यातून चार दिवसांपासून मारेकरी आणि मोईन यांच्यात धुसफूस सुरू होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी संशयित मारेक-यांनी मोईनला गावातील फातेमानगर चौकात बोलावले. काहीतरी विपरीत होऊ शकते, ही बाब मोईनच्या लक्षात आल्याने त्यांनी भाच्याला फोन करून फातेमानगरात येण्यास सांगितले.
इरफान मित्राला सोडण्यासाठी जात असताना त्याला रस्त्यात सोडून तो फातेमानगर चौकाकडे गेला. तेथे १५ ते २० जणांच्या टोळक्याने चोहोबाजूने मोईनला घेरून ते त्याच्यासोबत वाद घालत होते. तेव्हा काही जणांनी अचानक चाकू,तलवार,लाठ्या आणि रॉडने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात मोईन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मदतीसाठी धावलेल्या इरफानच्या डोक्यातही रॉड घातला. मोईन घटनास्थळीच बेशुद्ध पडला. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी इरफानला आणि अन्य लोकांनी मोईनला घाटीत दाखल केले.अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी इरफान यांच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.