प्लॉटिंग व पोषण आहारावर भर
By Admin | Published: October 5, 2016 01:03 AM2016-10-05T01:03:31+5:302016-10-05T01:16:49+5:30
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत प्लॉटिंग व शालेय पोषण आहाराचा मुद्दा चांगला गाजला.
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत प्लॉटिंग व शालेय पोषण आहाराचा मुद्दा चांगला गाजला. यावेळी संबंधित प्लॉटिंगधारकाने तेथील रहिवाशांना पूर्ण सुविधा दिल्याशिवाय त्या प्लॉटची नोंद घ्यायची नाही, असा ठराव घेण्यात आला.
सरपंच महेश भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेत सुरुवातीला प्र. ग्रामविकास अधिकारी ए.सी. पटेल यांनी विषयपत्रिका वाचून दाखविली. त्यानंतर लगेच गावातील नागरिक योगेश साळे यांनी गावात सुरू असलेल्या अवैध प्लॉटिंगचा विषय मांडला. प्लॉट विकणाऱ्याने सुविधा न दिल्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरीही त्या प्लॉटची ग्रामपंचायतीला नोंद घेतली जाते. या नोंदीवर आक्षेप घेऊन साळे यांनी संबंधित प्लॉटिंगधारकाने तेथील नागरिकांना पूर्ण सुविधा दिल्याशिवाय त्याची ग्रामपंचायतीला नोंद घेऊ नये, असा ठराव मांडला. तो संमत करण्यात आला. गावातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. वडगाव-साजापूर रस्त्याची तर फारच वाईट अवस्था झाल्याने या रस्त्यावर तात्काळ मुरुम टाकण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. लवकरच मुरुम टाकून खड्डे बुजविले जातील, असे सरपंच महेश भोंडवे यांनी सांगितले. त्यानंतर राजू दहातोंडे यांनी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा विषय मांडून विद्यार्थ्यांना शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात नसल्याचा आरोप केला व शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती विचारली. शाळेला कमी असलेल्या जागेबाबत मुख्याध्यापकाने लेखी स्वरुपात पत्र द्यावे अशी मागणी केली.
यावेळी मुख्याध्यापक एस.आर. भोरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे पोषण आहार देण्यात येत असल्याचे सांगून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आकडेवारी सांगितली. तंटामुक्ती अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा मुद्दा निघाला. मात्र तो विषयपत्रिकेवर नसल्याने मासिक बैठकीत चर्चा करून त्यावर विशेष सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपसरपंच हौसाबाई पाटोळे, श्रीकांत साळे, रमाकांत भांगे, श्रीकृष्ण भोळे, मोहन गिरी, अरुण वाहुळे, मंदा भोकरे, वैशाली जिवरग, संगीता कासार, उषा हांडे, चंदाबाई काळे, सुरेखा लगड, अलका शिंदे, उषा साळे, सुनील काळे, राम पाटोळे, कैलास भोकरे, बबन सुपेकर, प्रकाश निकम, नरेंद्र त्रिभुवन, एकनाथ साळे, काका जिवरग आदींची उपस्थिती होती.