सीबीआयमधील गोंधळाबद्दल पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 07:56 PM2018-10-25T19:56:52+5:302018-10-25T19:57:22+5:30
सीबीआयमध्ये आता जो गोंधळ सुरू आहे, त्यासंबंधीची माहिती पंतप्रधानांनी देशाला द्यावी, असे खा. पवार म्हणाले.
औरंगाबाद : केंद्रीय तपास संस्था अर्थात सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती का आणि कशी आणि कोणत्या आधारावर केली, याचे स्पष्टीकरण देशाच्या पंतप्रधानांनी द्यायला हवे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि संचालक आलोक वर्मा यांच्यात लाचखोरीवरून सध्या देशात वाद सुरू आहे. या दोघांची नियुक्ती त्यासंबंधी पंतप्रधानांना सर्व माहिती होती, त्यामुळे सीबीआयमध्ये आता जो गोंधळ सुरू आहे, त्यासंबंधीची माहिती पंतप्रधानांनी देशाला द्यावी, असे खा. पवार म्हणाले.
सीबीआयच्या कार्यालयात रात्रीतून कारवाई होते याचा अर्थ हे सरकार रात्रंदिवस काम करीत असल्याचा टोला मारत खा. पवार म्हणाले की, या विषयावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेले स्पष्टीकरण आपण वाचले. मात्र, सीबीआयचा पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असल्याने याप्रकरणी पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
खा. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले नाही. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधानांना आता सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांविषयी चांगलीच माहिती असेल म्हणून त्यांनी त्यांची निवड केली. ही नियुक्ती त्यांनी कोणत्या आधारावर केली, याची माहिती देशाच्या जनतेला मिळणे आवश्यक आहे. सीबीआयमधील वादाला पंतप्रधान जबाबदार आहेत का, या थेट प्रश्नावर मात्र खा. पवार यांनी पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.