प्रधानमंत्र्यांकडूनच व्हेंटिलेटरर्स ऑडीटचे आदेश; टीका सोडून भाजपच्या नेत्यांनी योग्य तो बोध घ्यावा - सतीश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 07:22 PM2021-05-15T19:22:06+5:302021-05-15T19:25:01+5:30
PM orders ventilator audit : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्रासह राज्यांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती.
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून अनेक राज्यांना दिलेले व्हेंटिलेटरर्स बिनकामाचे असल्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. आज झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी केंद्राने दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे तत्काळ ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच आ.चव्हाण यांनी, ''भाजपचे नेते यातून योग्य तो बोध घेऊन राज्य सरकारवर उठसुठ टीका करणार नाहीत हीच अपेक्षा..!' असा टोला राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्रासह राज्यांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. केंद्राकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांत धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले होते. याची पंतप्रधानांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्या वापराचे तत्काळ ऑडिट करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. गरज भासल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर्स वापरण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारीही करण्यात यावी, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांत नादुरुस्त व्हेंटिलेटर्समुळे राजकारण पेटले असल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपचे नेते सातत्याने केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर्स चांगले असल्याचा दावा करत होते. मात्र, अनेक रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स वापरण्यालायक नसल्याची माहिती पुढे आली होती.
औरंगाबादमधील खासगी आणि घाटी रुग्णालयातील तब्बल ३६ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी कुचकामीच ठरले होते. या नादूरुस्त व्हेंटीलेटरप्रकरणी आमदार सतिश चव्हाण यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी ''औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम केअर फंडातून पुरविण्यात आलेले व्हेंटिलेटरर्स निरूपयोगी असल्याने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत पीएम केअर फंडातून अनेक राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे तत्काळ ऑडिट करावे असे आदेश दिले आहेत. यानंतर आ. चव्हाण यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर , 'भाजप नेत्यांनी यातून योग्य तो बोध घ्यावा, उठसूट राज्य सरकारवर ते टीका करणार नाहीत,ही अपेक्षा',असा टोला लगावला आहे.