कोरोनासोबत न्यूमोनिया ठरतोय धोकादायक; जिल्ह्यात १० दिवसांत ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By ओमकार संकपाळ | Published: July 8, 2022 01:04 PM2022-07-08T13:04:08+5:302022-07-08T13:04:29+5:30
उपचारात ऑक्सिजनची पडतेय गरज; न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोनाची प्राधान्याने चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे
औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा वाढत आहे. या सगळ्यात कोरोनासोबत न्यूमोनिया असणारे रुग्ण समोर येत आहे. कोरोनाबरोबर न्यूमोनिया रुग्णांसाठी धोकादायक ठरू पहात आहे. जिल्ह्यात १० दिवसांत ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यातील रुग्णांना न्यूमोनिया असल्याचे आढळून आले. त्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.
पावसामुळे मलेरिया, डेंग्यू डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सर्दी, ताप, खोकला आणि तापाच्या रुग्णांची सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे. व्हायरल फिव्हरने लहान मुलांपासून ज्येष्ठ बेजार होत आहेत. न्यूमोनियाचे रुग्णही वाढत आहेत. न्यूमोनियाच्या रुग्णांपैकी काहींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोनाची प्राधान्याने चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे परंतु जे गंभीर रुग्ण येत आहे, त्यांना काेरोनासह न्यूमोनिया आणि इतर सहविकृती असल्याचे आढळून येत आहे.
पाच दिवसांवर ताप तर...
कोरोनाच्या रुग्णांमध्ये न्यूमोनियाही आढळून येत आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोरोनाच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असेल तर वेळीच काळजी घ्यावी, वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे घाटीतील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.
न्यूमोनियाचे दुष्परिणाम
-अशक्तपणा येणे.
- फुप्फुसांमध्ये पाणी किंवा पस भरणे.
- श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे, तो अपुरा पडणे.