एका कुटुंबाच्या त्रासामुळे महिला पोलीस पाटलाने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:37+5:302020-12-11T04:21:37+5:30
सिल्लोड/केळगाव : गावातील एका कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून केळगावच्या महिला पोलीस पाटलाने गुरुवारी दुपारी विषारी कीटकनाशक प्राशन केले. गंभीर अवस्थेत ...
सिल्लोड/केळगाव : गावातील एका कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून केळगावच्या महिला पोलीस पाटलाने गुरुवारी दुपारी विषारी कीटकनाशक प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यांना सिल्लोडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून त्यांना छळणाऱ्या कुटुंबांची माहिती देत, याला पोलीस यंत्रणा व अख्ख्या गावास जबाबदार धरल्यामुळे खळबळ उडाली.
पोलीस पाटील निर्मला बाळासाहेब हिवरे (३४, रा. केळगाव, ता. सिल्लोड) असे त्यांचे नाव आहे. गावातील रामदास वाघ, त्यांची आई मीरा वाघ, बहीण सुनीता वाघ यांनी पोलीस पाटील निर्मला यांच्या घरी येऊन गुरुवारी दुपारी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी मोबाइलवर रेकॉर्डिंग करून दुपारी ३ वाजेच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले. यावेळी त्यांचे पती सिल्लोडला गेलेले होते. त्यांचा मुलगा धीरज (१५) याने हा प्रकार पाहून आरडाओरड केली. त्याच्या आवाजाने नातेवाईक जमा झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
२.१९ मिनिटांचा व्हिडिओ
दुपारी १ वाजेच्या सुमारास घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी मोबाइलवर हा २.१९ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यांच्यावर बेतलेली आपबीती मांडताना त्या ओक्साबोक्सी रडत आहेत. मागील ३ वर्षांपासून रामदास वाघ व कुुटुंबीय शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देत आहेत. रामदास लज्जास्पद बोलतो. सतत ब्लॅकमेल करतो. पती घरी नसताना येऊन शिवीगाळ करतो. त्याची आई व बहीण त्याला मदत करतात. याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्या. गावकऱ्यांनीही मदत केली नाही. त्यामुळे आता मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही. माझ्या मृत्यूनंतर माझे पती व मुलांना न्याय द्या, अशी आर्त हाक देत त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला.
====================
तक्रार दिलेली नाही...
‘त्या’ महिला पोलीस पाटलाने याप्रकरणी लेखी तक्रार दिली नाही. उलट त्यांच्या विरोधात रामदास वाघ याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली होती; पण हा वाद गावात मिटविण्यात आला होता. जर पोलीस पाटलाला त्रास झाला असेल तर याची चौकशी करून संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.
- किरण बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण.
========================
काय आहे प्रकरण...
रामदास वाघ यांच्या वडिलांचा गेल्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू झाला होता; पण रामदास वाघ यांनी गावातील पोलीस पाटील, उपसरपंच यांच्यावर खून केल्याचे आरोप केले होते. पोलीस चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तेथून या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर रामदास वारंवार पोलीस पाटलांना त्रास देऊन वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असे.