उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा, पुंगळा गावातील ग्रामस्थांना रात्रीतून त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:36 PM2024-10-04T17:36:12+5:302024-10-04T17:36:51+5:30
भगर खाल्ल्यानंतर अचानक पोटात दुखून उलटी, जुलाबाचा अनेकांना त्रास झाला.
जिंतूर (जि.परभणी) : उपवासाची भगर खाल्ल्याने गावातील वेगवेगळ्या कुटुंबातील २५ ते ३० जणांना विषबाधा झाली. यामध्ये गुरुवारी रात्री त्यांना जिंतूर शहरात शासकीस, खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नवरात्रीचे उपवास असल्याने पुंगळा गावातील वेगवेगळ्या कुटुंबाने गुरुवारी संध्याकाळी भगर खाल्ली. अचानक पोटात दुखत असल्याने व उलटी, जुलाब होत असल्याने अनेकांना त्रास झाला. हा त्रास सहन झाल्याने जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. ही संख्या वाढतच गेली असून, २५ ते ३० जणांना रात्री वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. यामध्ये पाच ते सहा लहान मुलांचा, १० ते १५ महिलांचा समावेश आहे.
यामध्ये अर्चना विष्णू देशमुख (३८), गुलाब नारायण मोरे (६८), लक्ष्मीबाई गुलाबराव मोरे (३७), उमा बापूराव मोरे (२८), अमोल अच्युतराव देशमुख (२९), वैष्णवी विष्णू देशमुख (१४), राणी राजेभाऊ देशमुख (३८), राजेभाऊ देशमुख (३८), आकाश अच्युतराव देशमुख (२७), इशिता राजेभाऊ देशमुख (८), रक्षिता राजेभाऊ देशमुख (सात), कोमल राजेभाऊ देशमुख (१०) हे सर्व ग्रामीण रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात २५ ते ३० जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. काहींची प्रकृती आता सुधारत असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.