पोखरी ग्रामस्थांचे ठरले; १० लाखाच्या संगणक कक्षानंतर शाळेसाठी ५० लाख उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:15 PM2019-12-24T17:15:39+5:302019-12-24T17:19:58+5:30
वैजापूर तालुक्यातील पोखरी गावकऱ्यांचा संकल्प
- राम शिनगारे
औरंगाबाद : गावकऱ्यांनी मनात आणले तर शासकीय मदत न घेताही जिल्हा परिषदेची शाळा उत्तमपणे उभारली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची उपकरणे, साधने व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. हे दाखवून देण्याचे काम केले वैजापूर तालुक्यातील पोखरीच्या गावकऱ्यांनी. १० लाख रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेसह इतर सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आता शाळेला आवश्यक तेवढी जमीन खरेदीसाठी लोकवर्गणीतून ५० लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी जमा करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.
पोखरी जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय बनविण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी पुढाकार घेतला. पोखरीच्या गावकऱ्यांनी मागील तीन महिन्यांत लोकवर्गणीच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंत निधी गोळा करून संगणक प्रयोगशाळा, डिजिटल अंगणवाडी साकारली आहे. या प्रयोगशाळा आणि डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन सीईओ पवनीत कौर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
तत्पूर्वी गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी १५ डिसेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत प्रत्येक गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्यास सहमती दर्शविली. यावेळी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी विद्यमान शाळा आंतरराष्ट्रीय करताना तेथील जागा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा गावकऱ्यांनी शाळेसाठी २ एकर जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार खाजगी व्यक्तीची जमीन खरेदीसाठी लागणारा निधीही गावातूनच उभारण्यासाठी सहमती झाली. यात गावातील प्रत्येक घरासाठी (प्रतिउंबरा) ५ हजार रुपये आणि ५ एकरापेक्षा अधिक शेती असणाऱ्या कुटुंबाला त्यापुढील प्रतिएकर शेतीला १ हजार रुपये अधिक भार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यातून २५ ते ३० लाख रुपयांचा निधी जमा होणार आहे. याशिवाय गावातील ४० पेक्षा अधिक युवक हे शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी शाळेसाठी प्रत्येकी १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनही २५ ते ३० लाख रुपये निधीची उभारणी होईल, असेही ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले. याप्रकारे शाळेच्या जमिनीसाठी ५० लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी जमा होईल. तर त्या जागेवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय शाळा उभारणीसाठी विविध उद्योजकांना सीएसआरमधून निधी देण्याचे आवाहनही केले जाणार आहे.
मातृभूमी सेवा प्रतिष्ठानची स्थापना
शाळेला मदत करण्यासाठी गावातील शासकीय आणि अशासकीय नोकरीमध्ये कार्यरत असणाऱ्या ४० जणांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मातृभूमी सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. शिक्षक पदावर कार्यरत असलेले ठुबे यांनी १ लाख रुपये रकमेचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते शाळेला सुपूर्दही केला.
धार्मिक कामासाठीचे पैसे शाळेला देणार
गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे सतत आयोजन केले जाते. या धार्मिक कार्यक्रमांवर खर्च न करता त्यासाठी लागणारे पैसे शाळेसाठी खर्च करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या गावातील शाळेमध्ये वेगाने बदल होत आहे. मागील वर्षी ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रत्येक गावकरी सजग असल्याचेही शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.