पोलिसांची ५३० रिक्षांविरुद्ध कारवाई

By Admin | Published: June 24, 2014 12:51 AM2014-06-24T00:51:50+5:302014-06-24T01:08:46+5:30

औरंगाबाद : शहरात टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध वाहतूक पोलीस शाखेने धडक कारवाई सुरू केली

Police action against 530 rickshaw | पोलिसांची ५३० रिक्षांविरुद्ध कारवाई

पोलिसांची ५३० रिक्षांविरुद्ध कारवाई

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध वाहतूक पोलीस शाखेने धडक कारवाई सुरू केली असून, आठ दिवसांत ५३० रिक्षांचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. दरम्यान, यातील काही रिक्षा पोलिसांनी जप्त करून आयुक्तालयातील मैदानावर उभ्या केलेल्या आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईच्या निषेधार्थ रिक्षा मालक व चालकांनी दंड थोपटले असून, बुधवारी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील रिक्षा वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजित बोऱ्हाडे म्हणाले की, आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार केवळ टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. खंडपीठाने पोलीस व आरटीओला आदेश दिले आहेत की, टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध काय कारवाई केली ते ३० जून रोजी न्यायालयात प्रत्यक्ष येऊन सांगावे. त्यानुसार १६ जूनपासून टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ५३० टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध दंडात्मक कारवाई केलेली आहे. टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना कमीत कमी ३०० व जास्तीत जास्त ६०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.
रिक्षा किंवा टॅक्सीला करार पद्धत परवडत नसल्यामुळे शासनाने त्यांना शेअर पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यास अनुमती दिली. मात्र, आपल्याकडे शेअर पद्धतीमध्येही टप्पा पद्धत अवलंबून सर्रासपणे प्रवासी वाहतूक केली जाते. एका ठिकाणाहून तीन प्रवासी रिक्षात बसवून ती रिक्षा मध्ये कुठेही उभी न करता अथवा मध्येच प्रवासी उतरवून दुसरे प्रवासी न बसवता थेट ठरलेल्या ठिकाणीच प्रवाशांना सोडणे. यासाठी ३३ टक्के जादा भाडे वसूल करण्याची मुभा आहे. ते भाडे तीन प्रवाशांनी मिळून रिक्षाचालकास द्यायचे. मात्र, याही पद्धतीने शहरात प्रवासी वाहतूक केली जात नाही.
रिक्षाचा चालकांचा बुधवारी बंद
पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षा मालक व चालकांनी बुधवारी पहाटे ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद पुकारला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना रिक्षाचालक-मालक संयुक्त संघर्ष समितीने मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, रिक्षाचालकांजवळ कागदपत्रे असतानादेखील पोलीस मनमानीपणे त्यांना दंड आकारत आहेत.
टप्पा वाहतुकीचा परवाना कोणाला
महाराष्ट्रात केवळ एस. टी. बसलाच शासनाने टप्पा वाहतुकीचा परवाना दिलेला आहे. टॅक्सी, काळी-पिवळी, आॅटोरिक्षा व अन्य वाहनांसाठी करार पद्धतीच्या प्रवासी वाहतुकीला परवाना दिला जातो; पण काळी-पिवळी, रिक्षा हे टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतुकीला पसंती देतात. त्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस व आरटीओंनी विरोध केलेला आहे.

Web Title: Police action against 530 rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.