चिथावणीखोर व्हिडिओ प्रसारित करून शहराची शांतता भंग केल्याबद्दल हर्षवर्धन जाधवविरोधात पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:29 PM2019-04-27T23:29:04+5:302019-04-27T23:29:31+5:30
चिथावणीखोर व आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवाय त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून आणखी कडक कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली.
औरंगाबाद : चिथावणीखोर व आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवाय त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून आणखी कडक कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले. त्या दिवशी एक व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हिडिओतील तरुण महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करतो. या व्हिडिओमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्याने त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी झटपट कारवाई करून त्या तरुणाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आणि त्यास अटकही केली. ही कारवाई केल्यानंतर शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून ‘आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणारा एमआयएमचा कार्यकर्ता असल्याने एमआयएमने जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी केली. माफी न मागितल्यास शहरातील एमआयएमचे कार्यालय फोडून टाकण्यात येईल. याकरिता सर्वांनी शनिवारी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर यावे, असे आवाहन केले होते. जाधवांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहराचे वातावरण तापले. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला. तसेच त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून सायबर अॅक्टनुसार कारवाई करण्याची तयारी सुरू केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आमदार इम्तियाज जलील यांनी व्हिडिओ प्रसारित करून त्या तरुणाचा एमआयएमशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय कोणतेही महापुरुष विशिष्ट समाजाचे नाहीत. त्यांच्यासह सर्व महापुरुष आमचेही आहेत, असे नमूद केले.
हर्षवर्धन यांचा दुसराही व्हिडिओ
आ. जलील यांनी त्या तरुणाचा एमआयएमशी संबंध नसल्याचे जाहीर केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. एमआयएमने तलवार मॅन केल्याने आपल्या लढ्याला यश आल्याचे स्पष्ट करीत आंदोलन मागे घेतल्याचे सांगितले.